‘6,6,6,6,6,6,6,6,4,4,4,4,4,4,4,4,4,4,4’ बेन स्टोक्सच्या तुफानी खेळी पुढे ऑस्ट्रेलियाचा ‘धुव्वा’, इंग्लंडचा एका विकेटने विजय

लीडस : वृत्तसंस्था – विजयासाठी ७६ धावांची आवश्यकता, शेवटचा गडी मैदानात आलेला, अशावेळी कोणताही एक चांगला बॉल आणि सामना संपला, पराभव पदरी अशी संपूर्ण विरोधी परिस्थिती होती. अशा परिस्थितीतही बेन स्टोक्सने जॅक लीच यांच्या साथीने तब्बल एक तास किल्ला लढविला. केवळ किल्ला लढविलाच नाही तर इंग्लंडला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला. शेवटच्या गड्यासाठी तब्बल ७६ धावांची भागीदारी करीत एक इतिहास रचला.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशस कसोटी मालिका क्रिकेटप्रेमीमध्ये नेहमीच का लोकप्रिय आहे, याचा प्रत्यय रविवारी येथे आला. वर्ल्ड कपमधील कामगिरीने बेन स्टोक्स याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तिसऱ्या कसोटीने स्टोक्स याने झुंजार १३५ धावांची खेळी करुन एक अविस्मणीय विजय नोंदविला आहे.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७९ धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडला मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स, जेम्स पॅटिन्सन यांनी इंग्लंडचा डाव अवघ्या ६७ धावात गुंडाळला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला २४६ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यांनी इंग्लंडसमोर विजयासाठी ३५९ धावांचे लक्ष्य ठेवले.

चौथ्या डावासाठी इंग्लंड फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यावर सुरुवात चांगली झाली. एकवेळ त्यांच्या ४ बाद २५० धावा झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर एकामागोमाग विकेट पडत गेल्या आणि शेवटी ११५ षटकात ९ बाद २८६ अशी स्थिती आली होती. शेवटचा गडी जॅक लीच हा मैदानात उतरला होता. तर समोर बेन स्टोक्स होता. पण अशाही स्थितीत स्टोक्स याने संपूर्ण सामन्याचा खेळ आपल्या हाती घेतला.

पुढच्या १० षटकात त्याने सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली. एखादाच चेंडू की सामना संपला अशा स्थितीतही त्याने चौकार, षटकाराची आतशबाजी सुरु केली. समोर असलेल्या जॅकला एक तासात केवळ १७ चेंडू वाट्याला आले. त्यात त्याने १ धाव केली तरी स्टोक्सला संपूर्ण साथ देत विकेट राखून ठेवण्याचे काम केले. एक एक धाव गोळा करीत स्टोक्सने लक्ष्याकडे वाटचाल सुरु ठेवत आपले शतक साजरे केले. ३५९ हे लक्ष्य समोर येत गेले अशी सामन्यातील उत्कंठा वाढत गेली. १२६ व्या षटकात तर केवळ दोन धावा हव्या होत्या. तेव्हा स्टोक्सने सीमापार चेंडू धाडून एक अशक्यप्राय विजय साकारला. बेन स्टोक्स १३५ धावा करताना ११ चौकार आणि ८ षटकार खेचले.

बेन स्टोक्स आणि लीच यांनी दहाव्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी रचली. ही इंग्लंडकडून चौथ्या डावात दहाव्या विकेटसाठी केली गेलेली सर्वोच्च भागीदारी ठरली.

आरोग्यविषयक वृत्त –