Pune News : बेकायदा पोलीस चौकी प्रकरणात पुण्यातील ‘त्या’ वरिष्ठ निरीक्षकावर कारवाईची टांगती तलवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नगर जिल्ह्यातील बेकायदा चौकी प्रकरणात तत्कालीन तसेच सध्या पुण्यात कार्यरत असणारे व वरिष्ठांच्या मर्जीतील पोलीस निरीक्षकावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. कारवाई केल्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यासह नगर पोलीस दलात खळबळ माजली आहे.

नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव फाटा येथे बेकायदा पोलीस चौकी उभा केली होती. याप्रकरणी पारनेर येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे व श्रीरामपूर येथील संदीप कुलकर्णी यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी 14 जानेवारी रोजी खडपीठात सुनावणी झाली होती. यानंतर 16 जानेवारी रोजी जिल्हा पोलिस प्रमुखांनी खंडपीठात अहवाल सादर केला. मात्र त्यावर खंडपीठाचे समाधान झाले नाही. तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले निरीक्षक मसूद खान व सध्या संगमनेर येथे कार्यरत असलेले पोलीस उपअधीक्षक राहुल मदने या अधिकाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

दरम्यान पोलीस प्रशासनाने चौकीच्या उभारणीत कोणत्याही प्रकारे लोकवर्गणी जमा केली नाही, तर काही स्थानिक दानशूर मंडळींनीच ती उभारून पोलिसांच्या ताब्यात दिली, असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी खंडपीठात 16 डिसेंबर रोजी म्हणणे मांडले होते. मात्र ते खंडपीठाने फेटाळून लावले आहे. यावर आता 8 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

श्रीहरी बहिरट हे पुणे पोलीस दलात कार्यरत आहेत. ते सध्या खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करत आहेत.