फक्त BP अन् वेट लॉस नव्हे तर अनेक गंभीर समस्यांवर लाभदायक ठरतं कलिंगड ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   उन्हाळ्यात अनेक लोक कलिंगडाचं सेवन करतात. यात पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. म्हणून शरीरात पाण्याची पातळी चांगली ठेवण्यासाठी लोक याचं आवडीनं सेवन करतात. परंतु याचे अनेक फायदे आहेत जे खूप कमी लोकांना माहित आहेत. यामुळं शरीराला भरपूर प्रमाणात पाणी तर मिळतच सोबतच तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहता. कलिंगड नियमित खाल्लं तर याचे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. आपण याच आरोग्यदायी फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) हृदयरोग – हृदयरोगांपासून दूर राहण्यासाठी कलिंगड हा एक उत्तम उपाय आहे. यामुळं शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल कमी होते. यामुळं तुम्ही हृदयासंबंधित आजारांपासून दूर राहता. यामुळं ब्लॉकेजची समस्याही उद्भवत नाही. अनेकजण जेवण झाल्यानंतर कलिंगडाचं सेवन करतात. तुम्हीही जेवण झाल्यानंतर कलिंगड खाऊ शकता आणि याचे फायदे मिळवू शकता.

2) बॉडी हायड्रेशन – कलिंगडात पाणी आणि पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं. उन्हाळ्यात मुत्राशयासंबंधित अनेक आजार उद्भवतात. कलिंगड यासाठी खूप लाभदायक ठरतं. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी याचा खूप फायदा होतो. कलिंगडात 78 टक्के गर असतो. म्हणून ते कास खाद्य आणि पेयदेखील आहे. म्हणून उन्हाळ्यात आवर्जून याचं सेवन करायला हवं.

3) वजन कमी होतं – वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही व्यायाम करत असाल तर डाएटमध्ये कलिंगडाचा समावेश नक्की करा. यातील पाण्यानं पोट भरतं. लवकर भूकही लागत नाही. परिणामी तुमचं वजन वाढत नाही. म्हणून वजन कमी करत असाल तर याचं सेवन नक्की करा.

4) केस अन् त्वचा – कलिंगडात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतं. व्हिटॅमिन सीमुळं तुमची त्वचा मऊ आणि केसही मजबूत होतात. व्हिटॅमिन ए मुळं केस आणि त्वचा यांचं आरोग्य चांगलं राहतं. जर तुम्ही नियमित कलिंगड खाल्लं तर सौंदर्य चांगलं राहतं.

5) पचनाच्या सम्सया अन् रक्तदाब – कलिंगडाचं सेवन केलं तर रक्तदाब नियंत्रणात राहतो. यात फायबर भरपूर असतात. त्यामुळं अपचन, गॅस अशा समस्या येत नाहीत. पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी कलिंगडाचा खूप फायदा होतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.