पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तू-तू, मैं-मैं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०२१ मध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तू-तू, मैं-मैं सुरू आहे. त्यातच आता सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. मात्र, यावेळी टीका करताना घोष यांनी ममता बॅनर्जी विरुद्ध आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे.

पश्चिम बंगालमधील बनगाव येथे एका जाहीर सभेत संबोधित करताना दिलीप घोष म्हणाले, “ममता बॅनर्जी यांच्या रक्तात काय आहे, की त्या जय श्री राम बोलू शकत नाहीत. श्रीरामसोबत असे वर्तन का केले जाते,” अशी विचारणा करत त्यांनी अपशब्दांचा वापर केला आहे. आम्ही सत्तेत आल्यास कार्यकर्त्यांच्या सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला घेणार, असा इशाराही घोष यांनी यावेळी दिला.

… तर थेट स्मशानात पाठवू
दरम्यान, यापूर्वीदेखील दिलीप घोष यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना थेट हात-पाय तोडण्याची धमकी दिलेली. “तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी थांबवावी; अन्यथा त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यात येईल. सुधारणा झाली नाही तर अशा कार्यकर्त्यांचे हात, पाय तोडू आणि डोकं फोडल्याशिवाय राहणार नाही. या कार्यकर्त्यांना घरी पाठवण्याऐवजी रुग्णालयात पाठवू. जर त्यानंतरही बदल झाला नाही तर थेट स्मशानात पाठवू,” अशी धमकी घोष यांनी दिली होती.