बिग फाईट ! ‘या’ सीटवर होणार महासंग्राम, 2 माजी IPS अधिकारी आमने-सामने

कोलकता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा फिव्हर वाढत आहे. सर्वच पक्षात आयाराम गयाराम सुरू आहेत. विषेश म्हणजे आता या निवडणुकीच्या आखाड्यात दोन माजी आयपीएस अधिकारी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

त्यांच्यात होणाऱ्या बिग फाईटकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले आहे. डेब्रा या विधानसभा मतदारसंघात ही बिग फाईट होणार आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपकडून हे दोन्ही अधिकारी आखाड्यात उतरले आहेत. भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) माजी अधिकारी हुमायून कबीर यांनी नुकताच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते चंदननगर येथील पोलीस आयुक्त होते. भाजपनेही कबीर यांच्या विरोधात माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांना उभे केले आहे. नक्षलवाद्यांकडून हिंसाचाराच्या घटना वाढल्या होत्या. भारतींनी कठोर कारवाई करून नक्षलवादी चळवळीचे कंबरडे मोडले. कडवा माओवादी नेता कोटेश्वर राव याचा एन्काउंटर करण्यामागे भारती यांचीच रणनिती होती.

भारती घोष या एकेकाळी ममता बॅनर्जी यांच्या अगदी निकटवर्तीय मानल्या जात होत्या. ममता बॅनर्जी त्यांना मुलगी मानत होत्या. कर्तव्यकठोर असलेल्या भारती घोष यांनी ममतांच्या अवास्तव सूचना मानण्यास नकार दिला. ममतादीदींनी त्यांची बदली राज्य राखीव पोलीस बलामध्ये केली. याला कंटाळून भारती घोष यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. घोष यांनी २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता.