WB निवडणूक : काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत सोनिया गांधी, डॉ. मनमोहनसिंग; आझाद यांचे नाव नाही !

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांत होत आहे. त्यानुसार, तृणमूल काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांकडून सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर आता काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये विविध नेत्यांचा समावेश आहे. मात्र, राज्यसभेतून निवृत्त झालेले वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचे नाव नाही.

काँग्रेसने आज स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, सचिन पायलट, नवज्योतसिंह सिद्धू यांच्यासह पक्षाच्या 30 बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र, गुलाम नबी आझाद आणि G-23 च्या अनेक नेत्यांचा समावेश यामध्ये नाही. काँग्रेसकडून ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार, इंडियन सेक्युलर फ्रंटसोबत मिळून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश

सोनिया गांधी, डॉ. मनमोहनसिंग, राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा, मल्लिकार्जुन खर्गे, अशोक गहलोत, कॅप्टन अमरिंदरसिंग, भूपेश बघेल, कमलनाथ, अधीर रंजन चौधरी, बी. के. हरिप्रसाद, जितीन प्रसाद, आरपीएन सिंह, नवज्योतसिंह सिद्धू, अब्दुल मन्नान, प्रदीप भट्टाचार्य, दीपा दासमुंशी, ए. एच. खान चौधरी, अभिजित मुखर्जी, दीपेंद्र हुड्डा, अखिलेश प्रसाद सिंह, रामेश्वर ओराओन, अलमगीर आलम, मोहम्मद अजहरुद्दीन, जयवीर शेरगिल, पवन खेडा, बी. पी. सिंह यांच्यासह सलमान खुर्शीद, सचिन पायलट, रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या नावांचा समावेश आहे.