बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी यांचा TMC मध्ये प्रवेश, म्हणाल्या बंगालला केवळ ममता दीदीच हव्या आहेत

कोलकाताः पोलीसनामा ऑनलाईन – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेतेमंडळी पक्षांतर करताना दिसत आहेत. यातच बंगाली प्रसिध्द अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. टीएमसीचे महासचिव पार्थ चॅटर्जी, मंत्री सुब्रत चॅटर्जी आणि ब्रात्य बसु यांच्या उपस्थितीत सायंतिका यांनी टीएमसीत जाहीर प्रवेश केला आहे.

सायंतिका बॅनर्जी यांनी टीएमसीमध्ये प्रवेश करताच भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी आज अधिकृतरित्या टीएमसीमध्ये प्रवेश केला. मला ही संधी दिल्याबद्दल ममता बॅनर्जी यांचे मनापासून आभार मानते. मात्र खरे सांगायचे झाल तर गेल्या 10 वर्षांपासून मी ममता दीदींसोबत आहे. हीच वेळ आहे मतदारांना आपल भविष्य उज्वल करण्याची असे म्हणत त्यांनी बंगालला फक्त बंगालची मुलगी हवी आहे. बंगालला केवळ ममता बॅनर्जी हव्या आहेत, असे त्या म्हणाल्या. दरम्यान अभिनेत्री श्राबंती चटर्जी यांनी देखील राजकारणात उडी घेतली आहे. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री श्राबंती चटर्जींनी भाजपाप्रवेश केला. आतापर्यंत अनेक कलाकारांनी आतापर्यंत राजकारणात प्रवेश केला आहे.