बंगाली मुलं लादी ‘साफ’ करतात तर मुली बारमध्ये ‘नाच’तात ; मेघालयाचे राज्यपाल तथागत रॉय यांची ‘जीभ’ घसरली

शिलाँग : वृत्तसंस्था – पूर्वी बंगाल महान होता. आता बंगाली मुलं लादी साफ करतात आणि मुली बारमध्ये नाचतात असे वादग्रस्त विधान मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांनी केले आहे. काही राज्यांमध्ये हिंदीविरोधी वाद उफाळला आहे. यावर टिप्पणी करताना रॉय यांची जीभ घसरली.


रॉय हे बंगालचे असून ते पूर्वी भाजपामध्ये होते. सध्या अनेक राज्यांमध्ये हिंदी भाषेवरून वाद सुरु आहेत. त्यावर बोलताना रॉय म्हणाले की, बंगाली लोकांचा हिंदी विरोध म्हणजे अज्ञानाचे निदर्शक आहे. तसेच या मुद्दाचे बंगाली जनतेने राजकारण केले आहे. पूर्वी बंगाल महान होता आता या राज्याची महानता लोप पावली आहे. आता बंगाली मुलं लादी पुसतात तर मुली बारमध्ये नाचतात.

देशातील आसाम, महाराष्ट्र आणि ओडिशा ही राज्ये हिंदी भाषिक नाहीत. मात्र या राज्यांमध्ये हिंदीला विरोध होताना दिसत नाही. मग बंगालमध्ये का विरोध होत आहे. पश्चिम बंगाल ही विद्यासागर राव, रवींद्रनाथ टागोर आणि नेताजी याची भुमी आहे. मग या ठिकाणच्या जनतेने हिंदी का शिकू नये असा सवाल रॉय यांनी उपस्थित केला आहे.