Fastag वर मिळणार अनेक सुविधा, भरता येणार पेट्रोल-डिझेल आणि CNG

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  टोल प्लाझावर येणाऱ्या वाहनांसाठी FASTag बंधनकारक केला आहे. या FASTag चा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकारने आणखी काही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या सुविधांच्या माध्यमातून तुम्ही आता पेट्रोल-डिझेल भरू शकता. इतकेच नाहीतर या FASTag च्या माध्यमातून तुम्ही CNG ही भरू शकता.

केंद्र सरकारकडून FASTag मल्टिपर्पज सुविधेत काम करण्यास सुरुवात करत आहे. सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर या सर्व सेवा-सुविधा दिल्या जाणार आहेत. याबाबत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की गेल्या वर्षी कोरोना काळात टोल प्लाझावर सोशल डिस्टन्सिंग आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंटमध्ये FASTag फायद्याचा ठरला आहे. त्यानंतर 15 फेब्रुवारीपासून सर्व टोल नाक्यावर FASTag अनिवार्य केले आहे.

हैदराबाद, बंगळुरू विमानतळांवर सुरुवात

FASTag ला पार्किंग पेमेंटच्या माध्यमातून वापर करण्यासाठी हैदराबाद, बंगळुरु विमानतळांवर पायलट प्रोजेक्ट सुरु केला होता. त्याच्या यशानंतर आता दुसऱ्या टप्प्यात दिल्ली विमानतळ आणि कनॉट प्लेसवर FASTag च्या माध्यमातून पार्किंग फीच्या पेमेंटची सेवा सुरु केली जाणार आहे. तसेच पुढच्या टप्प्यात मुंबई, चेन्नई आणि कोलकातासह इतर काही शहरांत ही सेवा सुरु होणार आहे.