‘कोरोना’नं बेस्ट कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्याला मिळणार नोकरी

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अनेकजण जीवावर उदार होउन काम करीत आहेत. त्यामध्ये डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिका चालक, पोलिसांचा समावेश आहे. दुसरीकडे अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना इच्छितस्थळी पोहोचविण्यासाठी बेस्ट कर्मचार्‍यांनाही कोरोनाचा सामना करावा लागत आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याने आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाशी लढताना मृत्यू झालेल्या बेस्ट कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील एका सदस्यास बेस्ट उपक्रमात नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनामुळे बेस्ट कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचार्‍याच्या कुटुंबातील एका सदस्यास बेस्ट उपक्रमात नोकरी दिली जाणार आहे. ही नोकरी तृतीय आणि चतुर्थ श्रेणी वर्गातील असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. बेस्ट कामगाराची पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यापैकी एकाला नोकरी मिळणार आहे. बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव यांनी बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. आपण एवढयावरच थांबणार नाही. बेस्ट कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्रा रुग्णालय, एक कोटी रुपयांचे विमासुरक्षा कवच आणि शहीद दर्जा देण्याबाबत, तसेच इतर प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.