बेस्ट कर्मचाऱ्यांनी उपसलं संपाचं हत्यार, सर्वसामान्य वेठीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बेस्ट कामगारांनी आपल्या मागण्यासाठी मध्यरात्रीपासून संप सुरु केला असून तेव्हा पासून आतापर्यंत एकाही डेपोमधून एकही बस बाहेर पडलेली नाही. त्यामुळे कामाला जाणाऱ्या लोकांचे हाल सुरु झाले आहेत. त्यात देशभरातील संघटीत कामगारांनी मंगळवार व बुधवारी दोन दिवसांचा बंद पुकारला आहे. त्याला बेस्ट कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.
बेस्ट कामगारांचा संप टाळण्यासाठी गेले काही दिवस सुरू असलेली चर्चा अखेर निष्फळ ठरली. संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाने मेस्माअंतर्गत कारवाईचा इशारा दिला, तसेच औद्योगिक न्यायालयातून संप बेकायदेशीर ठरवून कामगारांनाच आव्हान दिले. यामुळे संतप्त कामगार सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांचे हाल होत आहेत.
सुधारित वेतन करार, दिवाळीचा बोनस, कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडविणे, बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

संपाचा फटका मुंबईतील जवळपास २५ लाख प्रवाशांना बसणार असल्याने संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाईचा इशारा महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिला आहे. गेले अडीच वर्षे कामगारांच्या मागणीपत्रावर चर्चा सुरू आहे. मात्र, कामगारांमध्ये आता प्रचंड असंतोष पसरला आहे. दरवर्षी आश्वासनावरच बोळवण होत आहे. त्यामुळे कामगारांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी दिल्याशिवाय संप टळणार नाही, असा इशारा बेस्ट वर्कर्स  युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिला आहे.

सत्ताधारी असल्याने शिवसेनेची संघटना संपात सहभागी होऊ शकत नाही. मात्र, कामगारांचा कौल संपाच्या बाजूने असल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. त्यामुळे या संपाला शिवसेना नेत्यांनी नैतिक पाठिंबा दर्शविला आहे. गेल्या वर्षी कामगारांनी पुकारलेला संप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर कामगारांनी मागे घेतला होता. त्यामुळे पुन्हा संप होऊ नये, यासाठी शिवसेना नेत्यांची धावपळ सुरू होती. दरम्यान, बेस्ट प्रवाशांचे हाल होऊ नयेत, यासाठी जादा गाड्या सोडण्यासाठी एस.टी. महामंडळाला पत्र पाठविले असल्याचे बेस्ट अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, ९५ टक्के कामगार संपाच्या बाजूने असल्यामुळे बससेवेवर परिणाम झाला आहे.