रेल्वेमध्ये नोकरीची ‘सुवर्ण’संधी ! परीक्षेशिवाय होणार निवड, असा करा अर्ज, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वेमध्ये अ‍ॅप्रँटिसच्या 2 हजार 792 पदांसाठी भरती निघाली असून, या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ही मुदत 9 जुलै 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. वाढवण्यात आलेल्या मुदतीनुसार पात्र व इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येऊ शकतो. सुरवातीला या भरतीसाठी 5 एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि लॉकडाऊनमुळे ही निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. आता ईस्टर्न रेल्वेच्या रेल्वे रिक्रूटमेंट सेलने(RRC) ट्रेड अप्रँटिसच्या या पदांसाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 15 ते 24 अशी वयोमर्यादा आहे. मात्र, एससी/एसटीसह अन्य प्रवर्गातील उमेदवारांना भरतीसाठी 10 वर्षांची सवलत देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराला दहावीत किमान 50 टक्के गुण मिळालेले असणे आवश्यक आहे. तसेच दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. अर्जदार उमेदवाराकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी सामान्य आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. तर एसीसी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला वर्गासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. प्रवेश शुल्काचा भरणा क्रेडिट, डेबिट कार्ड, एसबीआय, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.

ईस्टर्न रेल्वे अ‍ॅप्रँटिस रिक्रिटमेंट 2020 अंतर्गत भरतीसाठी लेखी परीक्षा होणार नाही. तर थेट भरती केली जाईल. त्यासाठी उमेदवारांना दहावीच्या परीक्षेत मिळालेले गुण, आयटीआयमध्ये मिळालेले गुण ग्राह्य धरून क्रमवारी तयार केली जाईल. त्यानंतर या गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.