कामाची गोष्ट ! मुलांसाठी आजपासूनच सुरू करा ‘बचत’, ‘या’ 3 पर्यायांमुळे नाही भासणार पैशांची कमतरता

मुंबई : सध्याच्या संकट काळाने प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी सतर्क केले आहे. आता बहुतांश लोक आपल्या बचतीसाठी नवीन मार्ग शोधत आहेत, जेणेकरून भविष्यातील आर्थिक गरजांची पूर्तता करता येईल. अशामध्ये हे सुद्धा जरूरी आहे की, आपल्यासोबत मुलांना सुद्धा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित केले जावे. हे पाहता आज आम्ही तुम्हाला असे पर्याय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या मुलांची गरजा पूर्ण करता येतील. याबाबत जाणून घेवूयात…

सध्या पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्स स्कीम, म्यूचुअल फंड्स आणि फिक्स्ड डिपॉजिट सारखे पर्याय आहेत. मुलांसाठी गुंतवणूक करताना मोठी सावधगिरी बाळगली पाहिजे. घाईगडबडीत गुंतवणूक करण्यापेक्षा शांतपणे विचारपूर्वक प्लॅनिंग करावे. मुलांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कशाची गरज भासणार आहे, याचा विचार करावा लागेल. त्या लक्ष्यांनुसार प्लान तयार करा.

(1) सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) –
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत 10 वर्षाच्या वयापर्यंत कोणत्याही मुलीचे आई-वडील किंवा कायदेशिर पालक हे खाते उघडू शकतात. सुकन्या समृद्धी योजना खाते कोणत्याही सरकारी बँकेत आणि पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. सध्या यावर व्याजदर 7.6 टक्के आहे. सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक किमान 250 रुपये जमा करता येतात. योजनेच्या अंतर्गत वार्षिक कमाल 1.50 लाख रुपये जमा करता येतात. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत गुंतवणूकीवर इन्कम टॅक्स सूट सुद्धा दिली जाऊ शकते.

सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडल्यापासून 15 वर्ष पूर्ण होईपर्यंत गुंतवणूक करावी लागते. परंतु, हे खाते 21 वर्षपूर्ण झाल्यानंतर मॅच्युर होते. खात्याला 15 वर्षापूर्ण झाल्यानंतर 21 वयापर्यंत यात्यात त्यावेळी ठरलेल्या व्याजदराने पैसे जोडले जातात.

नवीन खाते उघडण्यासाठी सरकारने दिली सूट

नुकतीच सरकारने सुकन्या योजनेत खाते उघडण्यासाठी पात्रतेच्या नियमात सूट देण्याची घोषणा केली आहे. पोस्ट ऑफिसच्या नव्या निर्देशानुसार, सुकन्या समृद्धी खाते 31 जुलै, 2020 ला किंवा त्याअगोदर त्या मुलींच्या नावाने उघडले जाऊ शकते, ज्यांचे वय 25 मार्च, 2020 ते 30 जून, 2020 पर्यंत लॉकडाऊनच्या कालावधी दरम्यान 10 वर्ष पूर्ण झाले आहे. या सवलतीमुळे त्या मुलींच्या पालकांना मदत मिळेल जे लॉकडाऊनच्या कारणामुळे सुकन्या समृद्धी खाते उघडू शकले नाहीत. अन्यथा, सुकन्या समृद्धी खाते केवळ जन्म तारखेपासून 10 वर्षांच्या वयापर्यंतच उघडता येते.

(2) पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) –
पब्लिक प्रॉव्हिडंट फंडद्वारे सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करू शकता. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पारंपारिक आणि लोकप्रिय गुंतवणूक माध्यम आहे. मुलांच्या नावावर पीपीएफ खाते त्यांचे आई-वडीलच उघडू शकतात. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे पीपीएफ खाते उघडता येते. पीपीएफवर सध्या व्याज 7.1 टक्के आहे.

पीपीएफ खात्याचा मॅच्युरिटी पीरियड 15 वर्षांचा आहे. वर्षभरात यामध्ये 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. जर तुम्ही 1.50 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली तर त्यावर तुम्हाला व्याज मिळत नाही. जर तुम्हाला दोन मुले आहेत तर वेगवेगळी पीपीएफ खाती उघडून 3 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. 15 वर्षानंतर तुमच्या खात्यातून सर्व रक्कम एकाच वेळी काढू शकता. यानंतर 5-5 वर्षासाठी खाते वाढवू देखील शकता.

(3) इक्विटी म्यूचुअल फंड –
इक्विटी म्यूचुअल फंड कोणत्याही अन्य गुंतवणूक पर्यायाच्या तुलनेत लाँग टर्ममध्ये जास्त रिटर्न देऊ शकतो. म्यूचुअल फंडमध्ये तुम्ही सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (सीप) द्वारे हप्त्यामध्ये गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही प्रोफेशनल आर्थिक सल्लागाराची मदत घेतलीत तर म्यूच्युअल फंडमध्ये लाँग टर्ममध्ये गुंतवणुकीतून चांगल्या फायद्याची शक्यता वाढते. मुलांच्या गरजांसाठी जर 10 वर्षानंतर पैशांची गरज असेल तर हे योग्य आहे की, गुंतवणूक लार्जकॅप फंडात करावी.