Mumbai News : 4 मार्गांवर आठवडयातील 7 ही दिवस धावणार BEST च्या वाहतानुकूलित बस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  काही दिवसांपूर्वी बेस्टने आपल्या ताफ्यात भाडेतत्त्वावर वातानुकूलित बस घेतल्या होत्या. सध्या बसची संख्या वाढली असल्याने त्यामुळे बेस्ट प्रशासनाने काही जुन्या बसमार्गांवर वातानुकूलित बसगाड्या सुरू केल्या आहेत. सोमवारपासून शहर विभागातील १०६, १३४, १३७ व १३८ या चार बसमार्गांवर बेस्ट उपक्रमाने वातानुकूलित मिनी बसगाड्या सुरू केल्या आहेत.

बॅकबे आगार ते कमला नेहरू उद्यानदरम्यान बस क्रमांक ए- १०६ वर २२ ते ३१ मिनिटांच्या अंतराने चार वातानुकूलित बस धावणार आहेत, तर बस क्रमांक ए १३४ बसमार्गावर बॅकबे आगार ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान शिवडीदरम्यान १९ ते ३८ मिनिटांच्या अंतराने सहा वातानुकूलित बस चालविण्यात येतील. नेव्हीनगर ते अहिल्याबाई होळकर चौक चर्चगेटदरम्यान बस क्रमांक ए १३७ या बसमार्गावर ८ ते १० मिनिटांच्या अंतराने सहा वातानुकूलित बस धावणार आहेत.

बॅकबे आगार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान ए १३८ या बसमार्गावर सात ते १४ मिनिटांच्या अंतराने सात वातानुकूलित बसगाड्या धावतील. या मिनी वातानुकूलित बसगाड्या ठेकेदारांमार्फत चालवण्यात येत असल्यामुळे या बसगाड्यांवर बसचालक ठेकेदाराचा व वाहक हा बेस्ट उपक्रमाचा असणार आहे. या बस आठवड्यातील सातही दिवस चालविण्यात येणार आहेत.