जुन्या चालकानं केला विश्वासघात, परळीपर्यंत केला पाठलाग अन् 25 लाखाची बॅग पळवली, औरंगाबादमधून दोघे ताब्यात

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मोंढा येथील मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी लॉक केलेल्या कारमधून २४ लाख ९७ हजारची बॅग चोरीला गेली. 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना पकडले. प्रकरणात परळी शहर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथून दोघांना ताब्यात घेतलं. आरोपींकडून एक कार आणि चोरीची रक्कम ताब्यात जप्त केली.

परळी शहरातील मोंढा मार्केटमध्ये औरंगाबादहून आलेल्या संजय गंगवाल यांच्या कारचे लॉक उघडून २४ लाख ९७ हजार रुपयाची बॅग अज्ञात व्यक्तीने गुरुवारी सकाळी चोरून नेली होती. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी कसून तपास सुरू केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही धागेदोरे हाती लागले. परळी शहराचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने युद्धपातळीवर तपास सुरू केला. यात एका व्यापाऱ्याच्या गाडीचा पाठलाग करत असल्याचे वाहन दिसले. वाहन क्रमांकावरून पोलिसांच्या एका पथकाने औरंगाबाद येथे जाऊन अधिक तपास केला.

अधिक तपास केला असता दोन्ही संशयित आरोपी त्यांनी वैजापूर येथून ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान त्यांनी चोरी केल्याचे स्पष्ट झालं. पोलिसांनी त्यांच्याकडून बॅग जप्त केली. या बॅग मध्ये २४ लाख आठ हजार रुपये सापडले. त्यांना परळी शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. ही कारवाई बीड जिल्हा पोलीस अधीक्षक राजा स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत कदम, डी. बी. पथकाचे जमादार भास्कर केंद्रे , गोविंद भताने, शंकर बुडे, सुनील अनमवार यांनी केली.

जुन्या ड्रायव्हरकडूनच घात

आरोपी हे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी या गावचे आहेत. त्यातील एक जण व्यापाऱ्याचा वाहन चालक असल्याचे माहितीत समोर आलं. आरोपीने औरंगाबाद येथूनच व्यापाऱ्यावर पळत ठेवली होती. परळीत संधी साधून त्यांनी कारचे लॉक उघडून आतील २५ लाख रुपये असलेली बॅग पळवली असल्याचे पोलीस कारवाईत समोर आलं.