प्रेयसीच्या आठवणीत तो बनला ‘बेवफा चायवाला’

लखनौ : वृत्तसंस्था – प्रेमाचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. विश्वासघात हा प्रेमासाठी खूप घातक आहे. ब्रेकअप झाल्यानंतर त्या नात्यातून बाहेर पडणं कठीण जातं. लखनौमध्ये एका प्रेमवीराने त्याच्या दगा देऊन गेलेल्या प्रेयसीच्या आठवणीत चक्क चहाचे दुकान थाटले आहे.  येथे ब्रेकअप झालेल्यांना चहाच्या बिलामध्ये विशेष सवलत दिली जाते. सध्या तरुणांमध्ये  हा चायवाला फारच लोकप्रिय  बनला आहे.

आदित्य सिंह असे या चहावाल्याचे नाव आहे. ब्रेकअप झाल्यानंतर त्याने चहाचे दुकान उघडण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याला ‘बेवफा चायवाला’ असे नाव दिले. प्रेमभंग झालेले अनेक लोक येथे सवलतीच्या दरातील चहा पिण्यासाठी येथे येतात. तसेच चहा पिऊन जाताना आदित्यची खुशाली विचारण्यासही विसरत नाहीत.

दुकानाची वैशिष्टये
लखनौमधील फन मॉलजवळ असलेल्या या दुकानात वेगवेगळ्या चवीचा चहा मिळतो. या दुकानाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेमी युगुलांसाठी येथे १५ रुपये दराने चहा मिळतो तर ब्रेकअप झालेल्यांना सवलतीच्या दरात १० रुपयात चहा मिळतो.

या दुकानामध्ये चहासोबतच बकवास मॅगी, बेईमान मॉइक्रोनी आणि बदनाम कॉफी अशी चित्रविचित्र नावे धारण केलेले पदार्थ मिळतात. कारण हे पदार्थ आदित्यच्या बेवफा प्रेयसीला आवडत असत.