सावधान…! बाजारात २०००, ५००, २०० च्या बनावट नोटांचा सुळसुळाट 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला असून यामुळे ग्राहकांना आणि विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. या नोटा खेळण्यातल्या असून हुबेहूब नव्या नोटांसारख्याच दिसतात. लोअर परेल येथे भाजी विक्रेत्यांना याचा फटका बसला आहे. बाजारात अशा बनावट नोटा खपविणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

सायंकाळच्या वेळी कार्यालये सुटत असल्याने भाजीपाला व इतर वस्तू घेण्यासाठी गर्दी होत असते. यामुळे विक्रेतेही ग्राहकांनी दिलेली नोट केवळ रंग पाहून किंवा दुमडलेली असते तशीच घेतात. यामुळे त्यांना खरी की खोटी नोट आहे हे समजत नाही. नंतर कोणालातरी सुटे पैसे द्यायचे झाल्यास किंवा रात्री हिशेब करताना बनावट नोट आढळल्याचे लक्षात येते.

अशा आहेत बनावट नोटा
या नोटा खेळण्यातल्या असून हुबेहूब नव्या नोटांसारख्याच दिसतात. काही नोटांवर सिरिअल नंबरच्या जागी ‘FULL OF FUN’ असेही लिहिलेले असते. तर बऱ्याच बनावट नोटांवर सिरिअल नंबर असतात. तसेच बाजारात ५ , १० रुपयांचे कॉईनही हुबेहूब इराण, इराकच्या कॉईनसारखे आले आहेत. यामुळेही फसवणूक होते.

अशी ओळखा बनावट नोट
– बनावट नोटेचा कागद खूपच पातळ असतो.

– खऱ्या नोटेवर चांदीची रेष दिसते, तर बनावट नोटेवर त्याची फोटोकॉपी पाहायला मिळते.
– बनावट नोट ही खऱ्या नोटेची कॉपी आहे. तिला स्कॅन करून तयार करण्यात येते.

खरं तर ग्राहक छोट्या छोट्या नोटाही बारकाईनं पाहत नाहीत, परंतु आता तुम्हाला त्या काळजीपूर्वक पाहाव्या लागणार आहेत. नोटांची खात्री झाल्यानंतरच त्या स्वीकाराव्यात. तुम्ही काळजीपूर्वक ती नोट पाहिली, तर तुम्हाला बनावट आणि खऱ्या नोटांमधला फरक समजून येईल.