सावधान ! खातेदारांना बँकेतून आलेला ‘तो ‘फोन असू शकतो फ्रॉड, जाणून घ्या माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोनाच्या संकटकाळात ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी भामटे विविध पद्धती वापरत आहेत. या काळात अनेकजण ऑनलाईन खरेदीवर भर देत असल्याने ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. तुमची एखादी लहान चूक देखील महागात पडू शकते. फ्रॉड कॉलच्या माध्यमातून देखील अनेकांना गंडा घातला जात आहे. याप्रकराच्या फसवणुकीला ‘व्हॉइस फिशिंग’ असेही म्हटले जाते. फ्रॉड करणारे भामटे आपण बँकेतून अधिकारी किंवा टेक टीममधील असल्याचे सांगून ग्राहकांची फसवणूक करतात.

ग्राहकांना अशा भामट्यांवर विश्वास बसतो आणि ते याचा फायदा घेत ग्राहकांची सर्व बँकेचे किंवा आर्थिक माहिती घेतात. अशा कॉल्सपासून स्वत:चा बचाव करणे आवश्यक आहे. सायबर सिक्युरिटी एक्सपर्टच्या मते हे भामटे फसवणूक करण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करतात. एटीएम क्लोनिंग, व्हॉट्सअॅप वरून फसवणूक, कार्ड डेटाची चोरी, युपीआयच्या माध्यमातून चोरी, लॉटरीच्या नावाने फसवणूक, बँक खात्याची तपासणी करण्याचे सांगून माहिती घेऊन फसवणूक अशा अनेक पद्धतीने ग्राहकांची फसवणूक होऊ शकते.

वेळोवेळी बँक खाते तपासा

अनेकवेळा बँकेतून बोलत असल्याचे फोन येत असतात. फोन करणारा व्यक्ती खूप प्रोफेशनल असल्याचा आव आणतो. ही लोकं स्वत: बँकेचे अधिकारी आहोत किंवा टेक टीमधील असल्याचे सांगून माहिती विचारतात. मिळालेल्या माहितीच्या आधारे ते फसवणूक करतात. यामुळे सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते तुम्ही तुमचे बँक खाते वेळोवेळी तपसणे आवश्यक आहे. जर तुम्ही ट्रान्झाक्शन केले नसेल आणि तसे ट्रान्झाक्शन दिसत असले तर लगेच बँकेला माहिती देणे आवश्यक आहे.

माहिती शेअर करु नका

माहिती विचारण्यासंबंधी फोन आल्यास बँकेची माहिती शेअर करून नका. फसवणूक करणारी व्यक्ती ग्राहकांना वन टाईम पासवर्ड (ओटीपी), सिक्युअर पासवर्ड, क्रेडिट, डेबिट कार्ड नंबर, कार्डवरील सीव्हीव्ही नंबर, कार्डची एक्सपायरी डेट, इंटरनेट बँकिंग लॉग इन आयडी-पासवर्ड अशी अन्य माहिती विचारते. मात्र, एक लक्षात ठेवा बँकेतून अशा प्रकारची माहिती विचारण्यासाठी फोन केला जात नाही. ही माहिती तुमची आणि गोपनीय असते. त्यामुळे बँक अधिकारी किंवा कर्मचारी अशी माहिती विचारण्यासाठी फोन करत नाही. जर तुम्हाला अशा प्रकारे फोन आला तर तुमची गोपनीय माहिती शेअर करू नका, अन्यथा महागात पडू शकतं.

या मार्गांनी देखील होऊ शकते फसवणूक

– डेबिट/क्रेडिट कार्डाच्या डेटाची चोरी
– एटीएम कार्ड क्लोनिंग
– नोकरी देतो असं सांगून ऑनलाईन फसवणूक
– बँक खात्याच्या तपासणीच्या नावाने फसवणूक
– मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरून फसवणूक
– यूपीआयच्या माध्यमातून फसवणूक
– व्हॉट्सअॅप कॉल करून फसवणूक
– ई-मेल स्पूफिंग
– रिवॉर्ड पॉईंटच्या नावाने फसवणूक
– क्यूआर कोडच्या माध्यमातून फसवणूक
– लॉटरी, पेट्रोल पंप डिलरशीपच्या नावाने ऑनलाइन फसवणूक