लाचखोर लिपिक ACB च्या जाळ्यात

पोलीसनामा ऑनलाईनः बाभळगाव (ता. जि. लातूर) येथील ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिकाला 3 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. नांदेड जिल्ह्यातील पथकाने मंगळवारी (दि. 2) ही कारवाई केली.

प्रमोद सीतापे असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित सेवा अंतर्गत मंजूर लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी कनिष्ठ लिपिक प्रमोद सीतापे यांनी 4 हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र तडजोडीनंतर तीन हजार रुपये घेण्याचे ठरले. दरम्यान तक्रारदाराने नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचून 3 हजाराची लाच स्विकारताना प्रमोद सीतापे यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.