भरधाव कार ने दुभाजक ओलांडून दुचाकीला उडवलं, दुचाकीवरील दोघे गंभीर (Photos)

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात असणाऱ्या कार ने दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर कार मधील दोघांना किरकोळ मार लागला आहे. हि घटना रविवारी दि.२५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०४:३० वाजता पुणे सोलापूर महामार्गावर केडगावच्या हद्दीमध्ये हॉटेल सर्जा जवळ घडली आहे.

या अपघातध्ये दुचाकीवर असणारे अमोल अशोक कदम व तुषार गोरख माळवदकर रा.दौंडज ता.पुरंदर जि.पुणे हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी संजय व्यंकट कदम रा.पारगाव ता.दौंड जि.पुणे यांनी फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी कार चालक अमित ज्ञानदेव पाटील रा.अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर या कार चालकावर गुन्हा दाखल केला असून तो अपघात झाल्यानंतर घटना स्थळावरून फरार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमोल अशोक कदम व तुषार गोरख माळवदकर हे दुचाकीवर यवत वरून दौंड येथे त्यांचा आजारी असणारा भाऊ किशोर माळवदकर यास भेटायला चालले होते यावेळी फिर्यादी संजय व्यंकट कदम हेही त्यांच्या पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवर त्यांच्या सोबत चालले होते.

केडगाव हद्दीमध्ये हॉटेल सर्जा जवळून जात असताना अचानकपणे पुणे दिशेकडे जाणारी बलेनो कार क्र. एम.एच.४२ ए.एच ३४५७ ही भरधाव वेगाने दुभाजक ओलांडून त्यांच्या दुचाकी क्र. एम.एच.१२ के.एम ५६१४ या दुचाकीवर येऊन आदळली या अपघातामध्ये दुचाकीवरील अमोल व तुषार दोघेही गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच बेशुद्ध झाले. त्यांना फिर्यादी व जमलेल्या नागरिकांनी त्वरित रुग्णालयात घेऊन गेले.

प्रथमोपचार करून त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. घटनेचा पुढील तपास पो ह जितेंद्र पानसरे करत आहेत