खळबळजनक ! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, ‘अ‍ॅसिड’ टाकून केली हत्या, आता पुन्हा होणार ‘पोस्टमार्टम’

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या भदोही जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह नदीकाठी सापडला आहे. गावाजवळील वीट भट्टी संचालकाने मुलीचा बलात्कार करून त्यानंतर तिच्यावर ऍसिड टाकून हत्या केली असल्याचा आरोप अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे.

या प्रकरणात पोलिसांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत बलात्कार आणि हत्येची बाब समोर आलेली नाही. आता पुन्हा पाच डॉक्टरांच्या पॅनेलद्वारे मुलीचे पोस्टमार्टम केले जाईल. शेतात जनावरे चरायला नेली असताना १७ वर्षाची मुलगी अचानक गायब झाल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणात कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला होता आणि या अल्पवयीन मुलीचा शोध घेतला जात होता. याच दरम्यान अल्पवयीन मुलीचा मृतदेह नदीकाठच्या झाडीत अडकलेला आढळला. मृतदेह खूप खराब झाला होता. मुलीवर ऍसिड ओतले गेले आहे.

या प्रकरणी पोलिस अधीक्षक राम बदन सिंह यांनी सांगितले की, रात्री उशिरा मुलीचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. बलात्कार आणि हत्येची बाब अद्याप पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आलेली नाही. सध्या पाण्यात बुडून मृत्यूची बाब समोर आली आहे.

ते म्हणाले की, ज्याप्रकारे कुटुंबाकडून भीती व्यक्त केली जात आहे, त्यामुळे आता पुन्हा मुलीचे पोस्टमार्टम केले जाईल. पाच डॉक्टरांची टीम आज पोस्टमॉर्टम करेल, जेणेकरुन या प्रकरणात उद्भवलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.

पोलिस अधीक्षक राम बदन सिंह म्हणाले की, पोलिस प्रत्येक गोष्टीचा शोध घेत आहेत. यामध्ये बऱ्याच लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यांची चौकशी केली जात आहे.