भाजपाच्या आमदारासह कुटूंबातील 6 जणांवर महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप, FIR दाखल

भदोही : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील भदोही मतदारसंघातील भाजप आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी यांच्यासह 6 जणांवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. बलात्काराचा आरोप एका विधवा महिलेनं केला असून पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी भदोही इथल्या एका हॉटेलमध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

वाराणसीमध्ये राहणाऱ्या महिलेने काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजप आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी आणि त्यांचा पुतण्या संदीपने तिला मुंबई येथून भदोहीला बोलावून घेतले होते. तिथल्या एका हॉटेलमध्ये काही दिवस तिला ठेवण्यात आले होते. याच दरम्यान भाजप आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी यांनी बलात्कार केला. तसेच पुतण्या आणि इतर मुलांनी देखील वेगवेगळ्या दिवशी बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 2014 मध्ये आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी यांच्या पुतण्याशी मुंबईला जाताना ओळख झाली होती. ट्रेनमध्ये मैत्री झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना त्यांचे नंबर दिले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून आमदारांच्या पुतण्याने अनेक वर्षे शारीरिक शोषण केलं. त्यानंतर 2017 मध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीवेळी आमदार त्रिपाठी यांचा पुतण्या संदीपने तिला मुंबईहून भदोहीत बोलावून घेत तिच्यावर बलात्कार केल्याचे म्हटले आहे. तसेच तिच्यावर आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी यांच्या कुटुंबातील सहा जणांनी हॉटेलमध्ये बलात्कार केला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आमदार त्रिपाठी यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

You might also like