भद्रावती : कुडरारा-चिरादेवी पांदन रस्त्यामुळे शेतकरी त्रस्त, रस्ता त्वरीत दुरुस्त करण्याची घोरुडे यांची मागणी

भद्रावती – तालुक्यातील कुडरारा-चिरादेवी या पांदन रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून ऐन शेतीच्या कामाच्या काळात या रस्त्याने ये-जा करणे कठीण झाले असल्याने या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करावी,अशी मागणी गोरजा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच श्रावणी प्रफुल्ल घोरुडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

सदर खराब रस्त्यामुळे शेतीची कामे खोळंबलेली आहेत.तसेच आता शेतातील माल निघण्याची वेळ आली आहे.या रस्त्याने शेतक-याची बैलबंडी जाणे तर दुरच.परंतू शेतक-यांनाही पायी चालता येत नाही.त्यामुळे शेतात जायचे कसे ? शेतातील माल घरी आणायचा कसा ? असे प्रश्न शेतक-यांसमोर निर्माण झाले आहे.रस्त्यात केवळ चिखल आणि चिखलच सर्वत्र पसरलेले आहे.

सदर रस्त्यासंदर्भात कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी दि.७ आॅगस्ट रोजी जिल्हा खनिकर्म अधिकारी चंद्रपूर यांना एक पत्र पाठवून खनिज विकास निधी २०२०-२१ अंतर्गत सदर रस्त्याच्या ५४ लाख २१ हजार ६०० रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याची विनंती केली आहे. सदर रस्त्याचे बांधकाम त्वरीत सुरु करुन या परिसरातील शेतक-यांची समस्या दूर करावी अशीही मागणी उपसरपंच श्रावणी प्रफुल्ल घोरुडे यांनी केली आहे.