भद्रावती : चांदा आयुध निर्माणीत स्वच्छता पंधरवाडा

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन   –   आयुध निर्माणीच्या कोलकाता बोर्डाच्या आदेशानुसार येथील चांदा आयुध निर्माणीत व वसाहतीत ‘स्वच्छता पंधरवाडा’ विविध कार्यक्रमांनी नुकताच उत्साहात पार पडला.

आयुध निर्माणीचे महाप्रबंधक राजीव पुरी यांच्या कुशल नेतृत्वात आयुध निर्माणी बोर्डाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन सदर पंधरवाडा यशस्वीरित्या पार पडला. या पंधरवाड्यानिमित्त दि.८ ते १५ डिसेंबरपर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी महाप्रबंधक पुरी यांच्या नेतृत्वात आयुध निर्माणीचे सर्व अधिकारी, कामगार संघटनांचे पदाधिकारी, जेसीएम सदस्य आणि सर्व कर्मचा-यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.तसेच अतिरिक्त महाप्रबंधक संदीप जैन यांच्या नेतृत्वात आयुध निर्माणीच्या मुख्य कार्यालयापासून सेंट्रल युनिटमधील विविध भागातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप मुख्य कार्यालयात झाला.यावेळी रस्त्यावरील कचरा उचलून कुंडीत टाकण्यात आला.आयुध निर्माणीच्या भंडारातील अनावश्यक वस्तुंची विल्हेवाट लावण्यात आली. शाॅपिंग काॅम्पलेक्स आणि पार्क सारख्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात सदर ठिकाणी व आसपासच्या परिसरात साफसफाई करुन कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छता पंधरवाड्याचे औचित्य साधून आयुध निर्माणी परिसर व वसाहतीत पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या हेतूने वृक्षारोपनही करण्यात आले.

या कार्यक्रमात वसाहतीतील नागरिक आणि लहान मुलांनी भाग घेऊन वृक्षारोपनाचा संदेश दिला. संपूर्ण परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी धुम्रीकरण करण्यात आले.आयुध निर्माणीच्या इस्पितळात ‘प्लाॅस्टिकचा वापर कमी कसा करावा’ आणि ‘जिवनात स्वच्छतेचे महत्व’ या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले. आयुध निर्माणीला प्लास्टिकमुक्त झोन बनविण्याच्या हेतूने वसाहतीत प्लास्टिक, पाॅलिथीन जमा करुन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.तसेच नाल्यांची सफाई करण्यात आली.

स्वच्छतेचा संदेश सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिने आयुध निर्माणीच्या पवन क्रीडांगणावर सर्व कर्मचारी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांकरीता मिनी मॅराथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला अधिकारीवर्ग, कर्मचारीगण, महिला आणि लहान मुलांनी मोठा प्रतिसाद दिला. या मॅराथान स्पर्धेचे उद्घाटन महाप्रबंधक पुरी यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करुन झाले. यावेळी विजेत्या स्पर्धकांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.मंगळवारी या पंधरवाडयाचा आयुध निर्माणीच्या हीरा हाऊसमध्ये समारोप करण्यात आला.यावेळी अधिकारीवर्ग व इतर कर्मचारी उपस्थित होते.