भगवानगडावरील बाबांच्या वापरातील रायफलची चोरी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पाथर्डी तालुक्यातील भगवानगड हे स्थळ लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. याच भगवानगडावर चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. भगवान बाबांच्या वापरातील वस्तूंच्या संग्रहातील दोन बोअरचे रायफल चोरीला गेल्याचे आज (गुरुवार) उघडकीस आले आहे. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भगवानगडावर बाबांनी वापरलेल्या वस्तूंचे प्रदर्शन लावले आहे. त्यातील दोन बोअरची रायफल चोरी गेल्याचे आज सकाळी उघडकीस आली आहे. या संदर्भात पाथर्डी पोलीस ठाण्यात प्राथमिक माहिती दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा ताफा गडावर दाखल झाला. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. सदरची रायफल ही भगवान बाबा वापरत होते.

या घटनेमुळे भगवान गडाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. भगवान बाबा यांच्यावर लाखो भावीकांची श्रद्धा आहे. दसऱ्याला या ठिकाणी लाखो भाविक येत असतात. भाजप नेते गोपीनाथ मुंडे तिथे मेळावा घेत असत. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे आणि तिथल्या महंतामध्ये वाद झाला आणि त्यांना मेळावा रद्द करावा लागला होता. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. तेव्हापासून भगवानगड राज्यभर चर्चेत आला होता.