नांदेडच्या भाग्यश्री जाधवने चीनमध्ये फडकवला भारताचा झेंडा

जागतिक क्रीडा स्पर्धेत २ कांस्य पदकांवर कोरले भारताचे नाव

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन  (माधव मेकेवाड) – चीन येथे सुरु असलेल्या जागतिक पॅराअ‍ॅथेलेटिक्स क्रीडा स्पर्धेत नांदेडची अष्टपैलू दिव्यांग खेळाडू भाग्यश्री माधवराव जाधव हिने चमकदार क्रीडा कौशल्य सादर करुन दोन कांस्य पदकांवर भारताचे नाव कोरले. क्रीडा क्षेत्रात गगन भरारी घेत तिने चीनमध्ये भारताचा झेंडा अभिमानाने फडकविला आहे.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज या ग्रामीण भागात सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भाग्यश्री माधवराव जाधव हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन दिव्यांग क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करुन अवघ्या दीड वर्षात आपला दबदबा निर्माण केला आहे. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील पॅराअ‍ॅथेलेटिक्स क्रीडा स्पर्धांमध्ये आपले अभिनव क्रीडा कौशल्य सादर करुन ग्रामीण भागात देखील अस्सल खेळाडूंची खान असल्याचे तिने सिध्द केले आहे.

राष्ट्रीय पातळीवर झळकलेल्या भाग्यश्री जाधव हिची निवड पॅरालिंपींक कमिटी ऑफ इंडिया यांनी चीन येथील जागतिक पॅराअ‍ॅथेलेटिक्स क्रीडा स्पर्धेसाठी केली होती. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेली ती महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू होती. अंतरराष्ट्रीय स्तरावर आपले क्रीडा कौशल्य सादर करण्याची सुवर्ण संधी तिला यानिमित्ताने प्राप्त झाली होती.

चीनमध्ये बिजिंग शहरात 7 मे पासून सुरु असलेल्या जागतिक पॅराअ‍ॅथेलेटिक्स क्रीडा स्पर्धेत भालाफेक व गोळाफेक या दोन्ही क्रीडा प्रकारात भाग्यश्री जाधव हिने दोन कांस्य पदकांवर भारताचे नाव कोरले. जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंचे नैपूण्य दाखवून देत तिने चीनमध्ये भारताचा झेंडा फडकविला त्याच बरोबर महाराष्ट्राचे देखील नावलौकिक केले.

होनवडज ते चीन या केवळ दीड वर्षाच्या क्रीडा प्रवासात आंतरराष्ट्रीय दिव्यांग अष्टपैलू खेळाडू भाग्यश्री जाधव हिला क्रीडा प्रशिक्षक प्रलोभ कुलकर्णी, आंतराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक राजू मुजावर (पुणे), आंतराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक सरदार लक्कीसिंह (पुणे), ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे, बळवंत अटकोरे आदींची बहुमोल मार्गदर्शन लाभले. जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश प्राप्त करुन भारताचा नावलौकिक कायम राखल्याबद्दल भाग्यश्री जाधव हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.