भय्यूजी महाराजांची मुलगी करणार त्यांच्यावर अंत्यसंस्कार

इंदौर : वृत्तसंस्था

सामाजिक, राजकीय, सांस्कृतीक, क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर आज ( बुधवार ) दुपारी १.३० च्या सुमारास इंदुरमधल्या मुक्तीधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असून,भैय्यू महाराजांची मुलगी कुहू त्यांच्या पार्थिवाला अग्नी देणार असल्याचे समजते आहे.

दरम्यान भैय्यूजी महाराजांनी मंगळवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरी ताण तणाव सहन न झाल्यामुळे डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तात्काळ इंदौरच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्राला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. भैय्यूजी महाराजांचे पार्थिव आज सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांच्या सुर्योदय आश्रमात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर मेघदूत मुक्तीधाम स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार असून त्यांची मुलगी कुहू त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार आहे.

त्यांच्या पहिल्या पत्नी माधवीची कुहू ही मुलगी आहे. ती सध्या बारावीचे शिक्षण घेत आहे. दोन वर्षापूर्वी पहिल्या पत्नी माधवी यांचे हृदविकाराने निधन झाले होते. यानंतर गेल्या वर्षी त्यांनी मध्ये प्रदेशातीत डॉक्टर आयुषी शर्मा यांच्याशी दुसरा विवाह केला होता.