भय्युजी महाराजांच्या हालचालीवर होते पत्नी, मुलीचे लक्ष

इंदूर : वृत्तसंस्था

भय्युजी महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी आणि मुलगी या दोघीही एकमेकीविषयी सेवेकरांकडून माहिती घेत असल्याचे तपासात पुढे आले आहे. दुसरीकडे भय्युजी महाराज हे डावखुरे होते. ते बहुतांशी कामे डाव्या हाताने करत होते. असे असताना गोळी झाडताना मात्र, त्यांनी उजव्या हाताने कशी काय गोळी चालविली, असा यक्ष प्रश्न सध्या तपास पथकाला पडला असून त्यासाठी पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाला दुसऱ्यांना भेट देऊन घटना घडली त्या खोलीची पुन्हा एकदा पाहणी केली.

१२ जून रोजी भय्युजी महाराज यांनी गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. भय्युजी महाराज यांच्या आत्महत्येला सहा दिवस होऊन गेले तरी त्यामागच्या कारणाचा उलगडा अद्याप होऊ शकला नाही. भय्युजी महाराज डावखुरे होते. ते बहुतांश कामे डाव्या हाताने करीत. असे असताना त्यांनी उजव्या हातात पिस्तुल धरुन उजव्या कानशिलाजवळ गोळी झाडली होती. पोलिसांना ही बाब खटकत आली आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

दुसरीकडे पोलिसांनी भय्युजी महाराज यांच्याशी संबंधित अनेकांचे जबाब घेतले असून त्यांच्या सेवादारांनी दिलेल्या जबाबातून अनेक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे.

महाराजांची दुसरी पत्नी आयुषी व मुलगी कुहू या सेवेकऱ्यांमार्फत भय्युजी महाराज यांच्यावर लक्ष ठेवून असल्याचे दिसून आले आहे. दोही एकमेकींची माहिती घेत होत्या. आयुषी या चालक शरद सेवलकर व सेवक शेखर शर्मा यांच्याकडून माहिती घेत होत्या. महाराज मुलीला कधी कधी काय काय बोलतात, याची त्या माहिती घेत असत. दुसरीकडे कुहूही महाराज व आयुषी कोठे फिरायला जात व आयुषीच्या आईवडिलांसाठी महाराजांनी काय काय केले याची माहिती ती घेत असल्याचे या जबाबातून पुढे आले आहे.