भैय्यू महाराजांचे पार्थिव इंदूरमध्ये दाखल

इंदूर:पोलीसनामा ऑनलाईन

अाध्यात्मिक गुरु भैय्यू महाराज यांनी काल स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आज दुपारी मध्यप्रदेशातील इंदूरमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत . दरम्यान आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव इंदूर येथील त्यांच्या आश्रमात आणले आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी अलोट जनसागर लोटला आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर इंदूरमधल्या मुक्तीधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भैय्यू महाराजांची सुसाईड नोट

आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. इंग्रजी भाषेत लिहलेली एक पानाची सुसाईड नोट त्यांच्या खोलीत सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी कोणालाही जबाबदार धरु नये असे लिहून ठेवले होते .

राहत्या घरातील खोलीत त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. सुसाईड नोट लिहून ठेवल्यानंतर लगेच त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आयुष्याच्या ताण-तणाव सहन होत नसल्याने व्यथित झाल्याने आपण आत्महत्या करत असून, आत्महत्येस कोणासही जबाबदार धरु नये असे चिठ्ठीत लिहून ठेवले होते .

आत्महत्या करतेवेळी घरामध्ये त्यांची आई, पत्नी आणि अनुयायी उपस्थित होते. गोळी झाडल्याच्या आवाजाने अनुयायी आणि त्यांच्या पत्नी व आईने महाराजांच्या खोलीकडे धाव घेतली. अनुयायांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता भय्यू महाराज जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.