भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, मुलीने केली ‘ही’ मागणी

इंदूर : पोलीसनामा ऑनलाईन –   आपल्या वडिलांची अनेक शहरांमध्ये कोट्यवधीची संपत्ती असून त्या संपत्तीचा वाटा मिळावा, अशी मागणी अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज(bhaiyyu maharaj) यांची मुलगी कुहूने (kuhu) यांनी केली आहे. त्यामुळे भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाला (bhaiyyu maharaj suicide case) नवीन वळण मिळाले आहे. भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे इंदूरसह देशात एकच खळबळ उडाली होती.

कुहूने इंदूरमध्ये एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. आईचे दागिने हे ठेवून घेतले आहेत. तसेच लॉकरच्या चाव्या सुद्धा आमच्याकडून घेतल्या आहेत. त्यामुळे मला घर सोडून हॉटेलमध्ये राहावे लागत असल्याची व्यथाच कुहूने यावेळी मांडली. भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात कुहू ही साक्षीदार असून या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कुहूने शुक्रवारी न्यायालयात माहिती दिली होती. भय्यू महाराज यांच्या घराच्या किचनमधून एक मोबाईल मिळाला होता. त्यात आरोपी पलक आणि महाराज यांच्यातील चॅटिंग होती. परंतु, याबद्दल तिच्याकडे कोणताही स्क्रीन शॉट पुरावा म्हणून नव्हता, असे वृत्त नईदुनिया या संकेतस्थळाने दिले आहे.

शुक्रवारी भय्यू महाराज यांची पत्नी आयुषी आणि बहीण अनुराधा यांनाही साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, आयुषी या हजर राहिल्या नाहीत. तसेच अनुराधा या सुद्धा उपस्थितीत राहिल्या नव्हत्या. याआधीही साक्ष नोंदवण्यासाठी दोघींनी टाळाटाळ केली होती.

भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर एक सुसाईट नोट सुद्धा घटनास्थळावर आढळून आली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांचा सेवादार विनायक दुधाले, शरद देशमुख आणि पलक पुराणिक यांना अटक केली होती. भय्यू महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तेव्हा पासून तिघेही आरोपी जेलमध्ये आहेत. शुक्रवारी आरोपींकडून एक अर्ज न्यायालयात दाखल केला होता. या मध्ये भय्यू महाराज यांची पत्नी आयुषी या विनाकारण न्यायालयात हजर होत नाही, असे नमूद केले आहे.