लग्नासाठी ‘ती’ भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करत असल्याचे उघड

इंदूर : वृत्तसंस्था – आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी त्यांचा विश्वासू सेवादार विनायक दुधाडे यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यात भय्यूजींना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीचाही समावेश आहे. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्यापैकी पलकने त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित युवतीने भय्यू महाराजांवर लग्नासाठी दबाव टाकला होता. लग्न न केल्यास दाती महाराजांप्रमाणे तुमच्यावर गुन्हा दाखल करु अशी धमकी तिने दिली होती.
पोलीस उपमहानिरीक्षक एच. सी. मिश्रा यांनी या प्रकरणी सुरू असलेल्या तपासाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘भय्यूजी महाराजांनी आपल्याशी लग्न करावे यासाठी पलक त्यांच्यावर दबाव आणत होती. त्यामुळे ती दुधाडे व देशमुखच्या मदतीने भय्यूजी महाराजांना औषधांचे जादा डोस देत होती. त्यातूनच भय्यूजींची मानसिक स्थिती बिघडली होती. भय्यूजी महाराज व पलक यांच्यातील अत्यंत आक्षेपार्ह सोशल मीडिया चॅटचे पुरावे आमच्या हाती लागले आहेत.’
१६ जून २०१८ पर्यंत आपल्याशी लग्न केले नाही तर मी तुमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करेन. तुमची बदनामी करेन, अशी धमकी पलकने दिली होती. त्याचदरम्यान, दाती महाराजांचं बलात्कार प्रकरण समोर आलं. त्याबाबतच्या बातम्या वारंवार भय्यूजींनी टीव्हीवर पाहिल्या. त्यातून ते आणखी भयग्रस्त झाले आणि पलकने लग्नकरण्यासाठी भय्यू महाराजांना एक वर्षाचा अल्टिमेटम दिला होता. त्याची मुदत १६ जूनला संपणार होती. त्याआधीच १२ जून रोजी भय्यू महाराजांनी आत्महत्या केली,असे पोलिसांनी नमूद केले.
भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी शर्मा आणि पहिल्या पत्नीची कन्या कुहू यांनी काही दिवसांपूर्वी पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) हरीनारायणचारी मिश्र यांची भेट घेतली होती. भय्यू महाराजांचे दोन सेवक आणि एका तरुणीने ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपांमुळे भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणाला अचानक नवीन वळण लागलं.
भय्यू महाराजांनी १२ जून २०१८ रोजी इंदूरमधील राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. घरगुती वादातून भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती.