भामा- आंद्रा धरणातील पाणी लवकरच मिळण्याची शक्यता

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहराची पाणी टंचाई पाहता भामा आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी मिळावे ही गेली अनेक वर्षाची मागणी असून ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. भामा आसखेड धरणातून ६० आणि आंद्रा धरणातून ३८ दशलक्ष असा एकूण ९८ दशलक्ष घनमीटर पाणी कोटा आरक्षित ठेवण्याबाबतचा  फेरप्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला असून तो प्रस्ताव मंत्री उपसमितीसमोर ठेवण्यात आला आहे.  सप्टेंबर अखेर आरक्षण कोट्याला परवानगी मिळेल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली असल्याची माहिती, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

[amazon_link asins=’B0085S0612′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6640473c-a5cc-11e8-bb68-fff3d38c13e8′]

पत्रकारांशी बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेची लोकसंख्या सुमारे २२ लाखाच्या आसपास पोहोचली आहे. तसेच मोठ्याप्रमाणावर ग्रृहप्रकल्पाचे प्रमाण वाढल्याने ४७०  एमएलडी पाणी कमी पडत आहे. त्यामुळे भामा आसखेड धरणातून ६० आणि आंद्रा धरणातून ३८ असे एकूण ९८ दशलक्ष घनमीटर  पाणी आणण्यात येणार आहे. हा पाण्याचा आरक्षित कोटा त्वरित मंजूर करावा, यासाठी सोमवारी (दि.२०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबत चर्चा झाली आहे.

आद्रा-भामा आसखेडचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार आहे. निविदा काढण्याची तयारी पुर्णपणे झाली आहे. आरक्षित पाणी कोट्यास मंजूरी मिळाल्यास काम त्वरित सुरु करण्यात येईल. तीन टप्प्यात काम करण्यात येईल. आद्रा-भामा आसखेड प्रकल्पाच्या कामादरम्यान शहरवासियांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी इंद्रायणीनदीवरील देहू बंधा-यातून शंभर एमएलडी पाणी उचलण्याची परवानगी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. सरकारने परवनगी दिल्यास  देहू येथील बंधा-यातून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणून तेथून परिसरातील भागास पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे.

आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी उचलून नवलाख उंब्रे येथे आणण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. नवलाख उंब्रे ते चिखली २६ किलोमीटर अंतर असून याठिकाणी पाईपलाईन ठाकण्यात येणार आहे. चिखलीतून शहरवासियांना पाणीपुरवठा करण्यात येईल, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.