माजी मंत्र्यांच्या नावाखाली फसवणूक करणारा भमाटा गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी ओळख असल्याचे सांगून सरकारी कोट्यातून स्वस्तात जमीन देण्याचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या संतोष दगडू मांजरे (वय ४८) याला पोलिसांनी सोलापूरमधून अटक केली. मांजरे हा अटक टाळण्यासाठी शेतात लपून राहत होता. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवून अटक केली.

संतोष मांजरे हा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील रहिवाशी आहे. संतोष मांजरे आणि वनमाला खरात यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी ओळख असल्याचे खुशलचंद पुणेकर यांना सांगितले. पुणेकर यांना बारामतीमधील सरकारी कोट्यातील सहा एकर जमीन पाच लाख ३६ हजार रुपयांना मिळवून देण्याचे अमिष दाखवले. खरात हिने मांजरे याच्या मदतीने पुणेकर यांच्याकडून सव्वा सहा लाख रुपये घेतेल. पैसे देऊनही जमीन न मिळाल्याने पुणेकर यांनी २०१७ मध्ये गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या दोघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.

संतोष मांजरे याचा पोलीस शोध घेत होते. मात्र, तो लपून बसल्याने पोलिसांना सापडत नव्हता. मांजरे हा शेतात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने पुणेकर यांच्याकडून घेतलेल्या पैशातून घर बांधल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपी मांजरे विरुद्ध लोणंद, आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. लोणंद येथील दाखल गुन्ह्यामध्ये तो जामीनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like