अवैध दारू विक्रीच्या वादातून चिमुकल्यासमोर आई-वडीलांना संपवलं

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – दोन कुटुंबातील वादातून दोघांचा खून झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. सालेबर्डी येथील दोन शेजाऱ्यांमध्ये सतत वाद होत होते. लहानसहान कराणावरून या दोन कुंटुबात सतत वाद होत होते. यातील मुख्य वाद हा अवैध दारू विक्रीवरु होता. याच वादातून ही मोठी घटन घडली आहे. सालेबर्डी येथील आरोपी मंगेशचा शेजारी असलेल्या विनोद बागडेसोबत सतत वाद होत होते. विनोद बागडे राहत्या घरातून अवैध दारू विक्री करत असल्याने शेजारी राहणाऱ्या आरोपी मंगेशसोबत त्याचे सतत खटके उडत होते. या दोघांनी परस्परविरोधी पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल केले होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सालेबर्डी येथे हातभट्टीची दारू विकणारा विनोद परमानंद बागडे (वय-39) याच्या शेजारी आरोपीचे घर आहे. विनोद व त्याची पत्नी प्रियंका बागडे (वय-31) यांच्या अवैध धंद्यावरून मंगेश गजभिये याचा नेहमी वाद होत होता. त्याने हा व्यवसाय बंद करावा यासाठी वारंवार सांगितले होते. दारू पिण्यास येणाऱ्या दारुड्यांमुळे या भागात सायंकाळी गोंधळ निर्माण होत होता.

याच कारणावरून मंगळवारी सायंकाळी साडसातच्या सुमारास त्यांच्या भांडण झाले. मंगेशने लोखंडी रॉडने विनोद व त्याच्या पत्नीवर हल्ला करून त्याचा खून केला. हा संपूर्ण प्रकार विनोदच्या पाच वर्षीय मुलासमोर घडला. घटनेची माहिती मिळताच कारधा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपास कारधा पोलीस करित आहेत.