दुर्दैवी ! दिवाळीच्या दिवशीच तिघा सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – दिवाळी सणाच्या मुहूर्तावर शेळ्या धुण्यासाठी तलावावर गेलेल्या तीन सख्ख्या भावांचा एकमेकांना वाचवताना बुडून दुर्दैवी (three-brothers-drown-lake) मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पुयार (चारभट्टी) येथील तलावात शनिवारी (दि. 14) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. दिवाळीच्या दिवशीच गरीब कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण पुयार गावावर शोककळा पसरली आहे.

मधुकर नीलकंठ मेश्राम (45), सुधाकर नीलकंठ मेश्राम (43) व प्रदीप नीलकंठ मेश्राम (39 तिघेही रा. पुयार) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सणामुळे परंपरेनुसार तिघेही भाऊ आणि तुषार मधुकर मेश्राम (13) असे चौघे जण शनिवारी सकाळी साडेअकराच्या 100 शेळ्या-मेंढ्यांना घेऊन धुण्यासाठी तलावावर गेले होते. प्रथम मधुकर हा काही शेळ्या-मेंढ्यांसोबत तलावातील पाण्यात उतरला. मात्र, तो पाण्यात बुडत असल्याचे सुधाकरला दिसले. त्याने भावाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, तोदेखील बुडताना दिसल्याने तिसरा भाऊ प्रदीपने पाण्यात उडी टाकली. तिघांनाही खोल पाण्याचा अंदाज न आल्याने एकमेकांना वाचवताना पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, यावेळी घटनास्थळावर हजर असलेल्या तुषारने मोबाइलवरून ही माहिती कुटुंबीयांना दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावातीलच काही नागरिकांच्या मदतीने तिन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक चहांदे यांच्यासह पोलीस नाइक दुर्योधन वकेकार, पोलीस अंमलदार संदीप रोकडे, अनिल साबळे, दशरथ सतिबावने, हुसेन नखाते आदींनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले.