भारत बायोटेकची Covaxin ठरतेय 81 % परिणामकारक, सीरमच्या लशीलाही टाकले मागे ?

पोलीसनामा ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सिन लस शंका- कुशंकामध्ये अडकली होती. मात्र आता ही लस प्रभावी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीचे निकाल बुधवारी (दि. 3) हाती आले आहेत. यात कोव्हॅक्सिन ही लस 81 टक्के परिणामकारक असल्याचे कंपनीने आणि आयसीएमआरने जाहीर केले आहे. यामुळे या लसीबाबतचा संभ्रम दूर होण्यास मदत मिळणार आहे. तसेच आता परिणामकारकतेच्या बाबतीत कोव्हॅक्सिन लसीने सीरमच्या कोव्हिशिल्ड लशीलाही मागे टाकल्याची चर्चा आहे.

देशात कोरोना लसीकरणाच्या दुस-या टप्प्याला सोमवारी (दि. 1) प्रारंभ झाला. यात ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त नागरिकांना लस दिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी कोव्हॅक्सिन लस घेतली, तर शरद पवारांनीही कोविशिल्ड लस घेतली की कोव्हॅक्सिन यावरुन सोशल मीडियावर दिवसभर तर्क-वितर्क लढवले जात होते. दोन्ही लसींची सुरक्षितता अन् परिणामकारकता मानवी चाचण्यांमध्ये सिध्द झाल्याने संभ्रम निर्माण होण्याचे कारण नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. कोविशिल्ड महापालिका रुग्णालयात तर कोव्हॅक्सिन जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे.

कोव्हॅक्सिन ही लस भारत बायोटेक आणि आयसीएमआरने एकत्रितपणे विकसित केली आहे. तिसऱ्या टप्प्य़ात 18 ते 98 वर्षे वयाच्या 25,800 लोकांवर चाचणी घेतली. बायोटेकने ही लस 60 टक्के परिणामकारक असेल असे गृहित धरले होते. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार सध्याचा आकडा हा अपेक्षेपेक्षा जास्त आहे. कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरावेळी वाद निर्माण झाला होता. यामुळे लोकांकडून सीरमच्या कोविशिल्डला मागणी होऊ लागली होती.