शिवसेनेच्या आमदारांमध्ये ‘खदखद’ वाढली, आता ‘हे’ आमदार नाराज

महाड : पोलीसनामा ऑनलाइन – मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील आमदारांमध्ये नाराजी आहे. तीन पक्षांपैकी काँग्रेसमध्ये सर्वाधिक आमदार नाराज आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार देखील नाराज आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांनी तर कॅबिनेट मंत्रीपद मिळाले नसल्याने राजीनामा दिल्याची चर्चा होती. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. आता शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले हे नाराज असून त्यांच्या समर्थकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घाडामोडी घडल्या. या नाट्यमय घडामोडीनंतर तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. मात्र, काही मंत्र्यांनी योग्य खाते न मिळाल्याने आपली नाराजी व्यक्त केली. तर काँग्रेसच्या एका मंत्र्याने खात्याचा पदभार स्विकारला नाही तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकिला दांडी मारली. यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात सर्व आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.

काही मंत्र्यांनी महत्त्वाचं खात न मिळाल्याने तर काही आमदारांनी मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने आपली नाराजी पक्षश्रेष्ठींसमोर मांडली. आता शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झाले आहेत. त्यांनी समर्थकांच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. महाड विधानसभेतून सलग तीन वेळा निवडून गेल्याने गोगवले यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, त्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. गोगावले यांच्या दक्षिण रायगडमधील समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गोगावले यांच्या समर्थनार्थ माणगाव येथे सभा घेऊन त्यांना मंत्री करण्याची मागणी करण्यात आली.

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकच आमदार असताना आदिती तटकरे यांना मंत्रिपद देण्यात आले. तर तीन वेळा निवडून आलेल्या गोगावले यांना मंत्रीपद का देण्यात आले नाही. असा प्रश्न गोगावले यांच्या समर्थकांनी उपस्थित केला आहे. गोगवले या निष्ठावंत शिवसैनिकावर अन्याय झाल्याची भावना समर्थकांची आहे. त्यामुळे शिवसैनिकांची नाराजी दूर करण्यासाठी पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/