भाजपकडून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या ‘या’ 40 उच्चपदस्थ व बड्या नेत्यांची हकालपट्टी

उत्तराखंड : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेचा पुन्हा दणदणीत आणि स्पष्ट कौल मिळाल्यानंतर मोदी सरकार २ मध्ये केंद्रपातळीवरून एकापाठोपाठ धडाकेबाज निर्णय घेतले जात आहेत. कामात दिरंगाई करणाऱ्या आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत मोदी सरकार अत्यंत कडकपणे निर्णय घेत असल्याचे दिसत आहे. कामचुकार अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्ती दिली जात आहे. प्रशासनाचे ठीक आहे परंतु पक्षातदेखील भाजपने अत्यंत कडकपणे निर्णय घेण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. उत्तराखंड राज्यात भाजपने पक्षविरोधी कार्यात भाग घेतल्यामुळे एकाच वेळी ४० सदस्यांना पक्षातून काढून टाकले. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, ही बातमी समोर आली आहे. कार्यकर्त्यापासून मंत्री पदापर्यंत जाण्याचा मार्ग पक्षाने दर्शविला आहे.

पाठीविरोधी भूमिका घेण्याच्या कारणास्तव बाहेरचा रास्ता दाखवत पार्टीतील नैनीताल, पिथौरागड, अल्मोडा, बागेश्वर, टिहरी आणि उत्तरकाशी भागातील अनेक सदस्यांना पक्षातून बाहेर करण्यात आले आहे. काढून टाकलेल्या नेत्यांमध्ये अनेक मोठ्या आणि उच्चपदस्थ नेत्यांची नावे देखील आहेत. या नेत्यांमध्ये खीमसिंग (विभागीय सरचिटणीस, रामगड), लखन नेगी (माजी ब्लॉक प्रमुख), जगत मार्टोलिया (जिल्हा मीडिया प्रभारी), हरीश सिंग (माजी सैनिक सेल अधिकारी), राजेंद्र सिंह (युवा मोर्चा मंडळाचे अध्यक्ष), कल्पना बोरा (राज्यमंत्री, महिला मोर्चा), मोहनसिंग रावत (जिल्हामंत्री) यांचा समावेश आहे. याशिवाय पक्षाने अनेक कार्यकर्त्यांना काढून टाकले आहे. भानसिंग, रवी नायल, हरेंद्रसिंग डरमवाल, भुवन चंद्र पांडे, सुशीला देवी, प्रमिला उनियाल, अनोर सिंग, सिद्धार्थ राणा, उर्मिला पुंडीर, सरिता रौतेला, नरेंद्र रावत, नरेंद्र सिंह आणि ताजवीर अशी या काढून टाकलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.

अशा प्रकारच्या निर्णयामुळे प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणाऱ्यांना दिलासा मिळाला असून पक्षाच्या विरोधात किंवा संकेतांच्या बाहेर जाऊन काम करणाऱ्यांविरोधात कडक आणि गंभीर संदेश गेल्याचे चित्र सध्या दिसत आहे. स्थानिक पातळीवर या निर्णयाचे स्वागत आणि कौतुक होत आहे.

Visit : Policenama.com