रिलायन्स Jio च्या ‘या’ पावलामुळं दूरसंचार कंपन्यांच्या ‘शेअर्स’मध्ये मोठी घसरण !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय बाजारपेठेत एअरटेल आणि जिओ या दूरसंचार कंपनींमध्ये थेट स्पर्धा आहे. बुधवारी एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) च्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. तर रिलायन्सचे शेअर्स तेजीसह बंद झाले आहेत. कारण रिलायन्स जिओने शानदार पाच पोस्टपेड प्लस प्लॅन जाहीर केले आहेत. वास्तविक, बुधवारी व्यापार दरम्यान एअरटेलच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांनी घसरण झाली. शेअर्स 423.95 रुपयांच्या नीचांकावर पोहोचले. तथापि व्यापाराच्या शेवटी ते 8.81 टक्क्यांनी घसरले. त्याच वेळी, व्होडा-आयडियाच्या शेअर्समध्ये 14.05 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली. शेवटी, ते सुमारे 10 टक्क्यांनी घसरले.

असे म्हटले जात आहे की रिलायन्स जिओच्या उत्तम पोस्टपेड योजनांच्या घोषणेमुळे एअरटेल आणि व्होडाच्या शेअर्समध्ये घट झाली आहे. जिओच्या नवीन प्लॅन्समुळे एअरटेल आणि व्होडा-आयडियासमोर एक कठीण आव्हान असणार आहे. रिलायन्स जिओने 395 रुपयांपासून ते 1,499 रुपयांपर्यंत नवीन पाच पोस्टपेड प्लॅन्स आणण्याची घोषणा केली आहे. या जिओ पोस्टपेड प्लॅन्समध्ये नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. याबरोबरच ग्राहकांना आणखी काही फायदेही मिळतील.

जिओ पोस्टपेड प्लस 24 सप्टेंबरपासून जिओ स्टोअर आणि होम डिलिव्हरीद्वारे उपलब्ध होईल. तसेच, जिओद्वारे 650+ लाइव्ह टीव्ही चॅनेल, व्हिडिओ कंटेट्स, 5 कोटी सॉंग्स आणि 300+ वर्तमानपत्रांसह जियो अ‍ॅप सेवांचा देखील लाभ मिळत आहे. नवीन जिओ पोस्टपेड प्लॅन्स संपूर्ण कुटुंबासाठी फॅमिली प्लॅनसह देखील येईल. त्यासाठी प्रत्येक कनेक्शनसाठी 250 रुपये द्यावे लागतील. तसेच, 500 जीबी पर्यंतचा डेटा रोलओव्हर आणि भारत आणि परदेशात वायफाय कॉलिंगचा देखील फायदा मिळेल.

याशिवाय एअरटेल आणि व्होडा-आयडियाच्या शेअर्सवर दबाव आणण्याचे कारण एजीआर पेमेंट प्रकरण देखील आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस टेलिकॉम कंपन्यांना एजीआर थकबाकी म्हणून किमान 12,921 कोटी रुपये द्यावे लागतील. त्यापैकी 80 टक्के रक्कम भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाला द्यावी लागेल. रिलायन्स जिओ ही एकमेव कंपनी आहे जिच्यावर एजीआर थकबाकी नाही.