Pune News : राजस्थानातून अफू घेऊन विक्रीस तो पुण्यात आला, अटक करून पोलिसांनी जप्त केला 17 किलो अफू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अलिशान मोटारीमधून तस्करी केला जाणारा 17 किलो 200 ग्रॅम अफू भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे पकडण्यात आला. याप्रकरणी मोटारचालकास अटक करण्यात आली असून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महिपाल गणपत विष्णोई (वय-30 रा. साई हाईट्स, हरपळे वस्ती, फुरसुंगी, मुळ रा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

राजस्थान तसेच उत्तरेकडील काही राज्यात अफुची लागवड करण्यास केंद्र शासनाच्या अमली पदार्थ नियंत्रण विभागाची परवानगी लागते. परवानगी शिवाय अफुची विक्री तसेच लागवड करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बिष्णोई राजस्थानातून अफू विक्रीस घेऊन होंडा सिटी मोटारीतून कात्रज चौकातून निघाला होता. त्यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस नाईक वणवे आणि मांढरे कात्रज चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी संशय आल्याने मोटार थांबवण्यात आली. मोटारीची डिक्कीची पाहणी करण्यात असता डिक्कीतील एका पोत्यात अफुची बोंडे (दोडा चुरा), पाने सापडली.

या घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन गायकवाड, रवींद्र भोसले, संतोष भापकर यांनी घटनास्थळी धाव घेत अफूची बोंडे जप्त केली. आरोपीने अफु कोठून आणला, कोठे घेऊन चालला होता, आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का. याचा तपास केला जात आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.