भय्यू महाराजांच्या संपत्तीचा आर्थिक कारभार ‘त्या’ व्यक्तीकडे

इंदूर:पोलिसनामा ऑनलाईन

आध्यात्मिक गुरु भैय्यू महाराज यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहली होती. माझ्या जाण्यानंतर माझ्या कुटुंबीयांची काळजी घ्या असे त्या पत्रात नमूद केले होते. पण एका टीव्ही चॅनलने दिलेल्या माहितीनुसार भैय्यूजी महाराजानी आपली संपत्ती आपली पत्नी आणि मुलीच्या नावावर नाही तर एका विश्वासू अनुयायाच्या नावावर केल्याचे समजते आहे. विनायक असे या विश्वासू अनुयायाचे नाव आहे. ही बातमी ऐकून सर्वांनीच भुवया उंचावल्या आहेत. भय्युजी महाराजांनी असा निर्णय का घेतला असावा, याबद्दल निरनिराळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, आज दुपारी मध्यप्रदेशातील इंदूरमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव इंदूर येथील त्यांच्या आश्रमात आणले आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी अलोट जनसागर लोटला आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर अडीच वाजता इंदूरमधल्या मेघदूत मुक्तीधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक तसेच करमणूक क्षेत्रातील मंडळींचा भय्युजी महाराजांशी संबंध होता. त्यांचा सल्ला व आशीर्वाद घेण्यासाठी या क्षेत्रातील मंडळी नेहमी त्यांच्याकडे जात. मात्र, दोन महिन्यांपूर्वी त्यांनी अध्यात्म व सामाजिक कार्यातून निवृत्ती घेतली होती.

भैय्यू महाराजांची सुसाईड नोट

आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. इंग्रजी भाषेत लिहलेली एक पानाची सुसाईड नोट त्यांच्या खोलीत सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी कोणालाही जबाबदार धरु नये असे लिहून ठेवले होते .

राहत्या घरातील खोलीत त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. सुसाईड नोट लिहून ठेवल्यानंतर लगेच त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आयुष्याच्या ताण-तणाव सहन होत नसल्याने व्यथित झाल्याने आपण आत्महत्या करत असून, आत्महत्येस कोणासही जबाबदार धरु नये असे चिठ्ठीत लिहून ठेवले होते .

आत्महत्या करतेवेळी घरामध्ये त्यांची आई, पत्नी आणि अनुयायी उपस्थित होते. गोळी झाडल्याच्या आवाजाने अनुयायी आणि त्यांच्या पत्नी व आईने महाराजांच्या खोलीकडे धाव घेतली. अनुयायांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता भय्यू महाराज जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.