‘भीम आर्मी’ आणि RSS ची विचारधारा ही मिळतीजुळती, सरकारचं शपथपत्र

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस आणि राज्य सरकारने नागपूर खंडपीठात भीम आर्मी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही मिळतीजुळती असल्याचं प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. या विचारधारेमुळेच भीम आर्मीच्या मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

२२ फेब्रुवारीला भीम आर्मीने नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर मेळाव्याचं आयोजन केलं होतं. दरम्यान कोतवाली पोलिसांनी या मेळाव्याला परवानगी नाकारली होती. त्यामुळे भीम आर्मीकडून न्यायालयात धाव घेण्यात आली. भीम आर्मीचे नागपूरचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल शेंडे यांनी ही याचिका दाखल केली होती. संघाच्या हेडगेवार स्मारकाच्या शेजारील रेशीमबाग मैदानावर हा मेळावा होणार असून या मेळाव्याला भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद देखील उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, या मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे कारण या मेळाव्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे. त्यावर २० फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश कोर्टाने पोलीस आयुक्तांना बजावले होते. त्यास उत्तर देताना पोलीस आणि राज्य सरकारने हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. दरम्यान, भीम आर्मीच्या वतीने दुपारनंतर कोर्टात युक्तिवाद केला जाणार आहे. आता कोर्ट याच्यावर कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.