#Loksabha : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात रावण लढणार निवडणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीतून त्यांच्या विरोधात भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण निवडणूक लढवणार असल्याचे समजते. शुक्रवारी नवी दिल्लीतील हुंकार रॅलीत आझाद यांनी याबाबतचे सुतोवाच केले.

आझाद म्हणाले की, मोदी हे दलितविरोधी आहेत. मी जेव्हा वाराणसीतून निवडणूक लढवणार हे त्यांना समजले. त्यांनी एका कार्यक्रमात आमच्या बांधवांचे पाय धुतले. मी आता वाराणसीला जात आहे. त्यांचा पराभव करण्यासाठी मला तुमची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही वाराणसीतून निवडणुक लढविणार आहेत. मात्र, त्याची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

chandrashekhar-azad-1

रावणाच्या मदतीने काँग्रेस देणार बसपाला धक्का

उत्तर प्रदेशात दलित नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण करणारे चंद्रशेखर आझाद रावण यांच्या मदतीने काँग्रेस बसपाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी नुकतीच आझाद यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या भेटीद्वारे उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठा संदेश पोहचविला गेला आहे. देशभरात कोठेही काँग्रेसबरोबर सहकार्य न करण्याचा निर्णय घेणाऱ्या बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यासाठी हा मोठा राजकीय संकेत मानला जात आहे. चंद्रशेखर आझाद रावण हे या वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात आले होते. मुंबई तसेच पुण्यात त्यांच्या जाहीर सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, त्यांनी कोरेगाव भीमा येथे भेट देऊन विजयस्तंभाला अभिवादन केले होते. यावेळी राज्यभरातून तेथे आलेल्या दलित तरुणाईकडून त्यांना मिळालेला प्रतिसाद खूप मोठा होता. सपा-बसपा आघाडीतून काँग्रेसला बाहेर ठेवण्यात मायावती यांची महत्त्वाची भूमिका होती. यामुळे काँग्रेस नाराज आहे. त्यामुळेच त्यांनी चंद्रशेखर यांच्या निमित्ताने बसपाला राजकीय मात देण्याचा निश्चय केला.

पश्चिम उत्तर प्रदेशात चंद्रशेखर आझाद रावण यांनी अलीकडच्या काळात दलितांमधील आपली प्रतिमा निर्माण केली आहे. सध्याच्या दलित राजकीय नेत्यांविषयी तरुणाईच्या मनात निराशा असल्याने आझाद यांना वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे. आपले नेते म्हणून चंद्रशेखर आझाद रावण हे कांशीराम यांचे नाव घेतात. कांशीराम हे आपले आदर्श असल्याचे ते सांगतात. त्यामुळे बसपा अधिक अस्वस्थ होत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी चंद्रशेखर आझाद रावण यांच्याशी चर्चा करून हे संकेतही दिले आहेत की, त्या आपल्या पक्षात तरुणांची आणि विशेषत: दलित तरुणांची फौज तयार करण्यात व्यस्त आहेत. उत्तर प्रदेशात ही उणीव चंद्रशेखर आझाद यांच्या रूपाने भरुन काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे काँग्रेसला उत्तर प्रदेशात दलित मते वाढविण्यास मदत तर होईलच; पण एक मजबूत जनाधार असणारा दलित वक्ताही मिळणार आहे.