ठाकरे सरकारकडून आंदोलकांना मोठा दिलासा ! कोरेगाव भीमाचे 348 व मराठा आंदोलनाचे 460 गुन्हे मागे

मुंबई : पोलीनामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा आणि मराठा आंदोलनामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेल्या तरुणांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. यामध्ये कोरेगाव भीमा, मराठा आरक्षण आंदोलन आणि शेतकरी आंदोलनाचा समावेश आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील 348, मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे घेण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तर शेतकरी आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात राज्यभरात विविध समाजघटकांची मोठी आंदोलने झाली. शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संप पुकारला. तर महिला अत्याचार आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला. दुसरीकडे 1 जानेवारीला शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार उसळल्यानंतर मोठं आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान आक्रमक झालेल्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी काही गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात नियमाच्या आधीन राहून कोणत्याही मालमत्तेचे नुकसान केले नाही, असे गुन्हे मागे घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आरे आंदोलन आणि नाणार प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले. त्यानंतर आता मराठा आंदोलन आणि कोरेगाव भीमा प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले आहेत.