‘भिमाकोरेगाव’ न्यायासाठी निघणारी रॅली यशस्वी करा – सीमा रामदास आठवले

पिंपरी : भिमाकोरेगाव’ दंगली प्रकरणातील संशयीत आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी गुरुवारी (दि. 28 जानेवारी) पिंपरी ते मंत्रालय मुंबई निघणा-या दुचाकी रॅलीत रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व महिला आघाडीने सहभागी होऊन लढा यशस्वी करावा, असे आवाहन आरपीआय (अ) पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सीमा रामदास आठवले यांनी केले. भिमाकोरेगाव हल्ला विरोधी आंदोलन समन्वय समितीच्या समन्वयक सुवर्णा राहुल डंबाळे, मेघा आठवले, अंजना गायकवाड यांच्यासह महिला आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सीमा आठवले यांना पुणे येथे भेटून पत्र दिले.

सिमा आठवले म्हणाल्या की, तीन वर्षापूर्वी भिमाकोरेगावला दंगल झाली होती. या दंगलीतील प्रकरणातील प्रमुख संशयीत आरोपी इतर पंधराशे आरोपींना अद्यापही अटक झाली नाही, त्यामुळे देशभरातील आंबेडकरी जनतेत तीव्र असंतोष वाढत आहे. सरकार या प्रकरणी न्याय कधी देणार असा प्रश्न घेऊन भिमाकोरेगाव हल्ला विरोधी आंदोलन समन्वय समितीचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी गुरुवारी (दि. 28 जानेवारी 2021) पिंपरी ते मंत्रालय, मुंबई दुचाकी रॅली काढणार आहेत. या रॅलीला रिपाइंच्या वाहतूक आघाडीने पाठिंबा दिला आहे. रिपाइं महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिका-यांनी सहभागी व्हावे. या रॅलीचे संघटन पाहून सरकार देखील योग्य ते पाऊल उचलेल अशी आशा सिमा आठवले यांनी व्यक्त केली.

रॅलीच्या समन्वयक सुवर्णा डंबाळे म्हणाल्या की, भिमा कोरेगाव हल्ल्यामधील आरोपींवर शिक्षेची कारवाई करावी या मागणीसाठी रॅली होणार आहे. जनजागृती करीत पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबई परिसरातील वस्तांमध्ये चाळीस बैठका घेण्यात आल्या आहेत. अद्यापही बैठका सुरु असून, या रॅलीत सहभाग घेण्यासाठी चार हजारांहून जास्त दुचाकीस्वारांनी उर्स्फुतपणे नोंदणी केली आहे, असे त्यांनी सांगितले.