ISSF World Cup : अभिषेक वर्माचा सुवर्णवेध ; ऑलिम्पिकमध्ये एण्ट्री

बीजिंग : वृत्तसंस्था – बीजिंगमध्ये सुरु असलेल्या नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये भारताच्या अभिषेक वर्मानं १० मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. या सुवर्णपदकासह २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता निश्चित केली. २०२० ऑलिम्पिकला पात्र ठरणारा अभिषेक भारताचा पाचवा नेमबाजपटू ठरला आहे. याआधी अंजुम मुदगील, अपूर्वी चंडेला , सौरभ चौधरी आणि दिव्यांश सिंग पानवर यांनी ऑलिम्पिक पात्रता निश्चित केली आहे.

अभिषेकने १० मीटर एअर पिस्तुल प्रकाराच्या अंतिम फेरीत २४२. ७ गुणांची कमाई करताना सुवर्णपदक जिंकलं. रशियाच्या आर्तेम चेर्नोसॉव्हला रौप्य तर कोरियाच्या सेयुंग्वो हानला कांस्यपदक मिळालं आहे.

अभिषेकचं नेमबाजी विश्वचषकातलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. यापूर्वी अभिषेकनं २००८ च्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. २०१९ च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे.