भिवंडी : ग्रामसभा न घेणाऱ्या सरपंचांचे सभासदत्व न्यायालयाने केले रद्द !

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – वर्षभराच्या विहित मुदतीत ग्रामसभा न घेतल्याने सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय अप्पर जिल्हाधिकरी वैदही रानडे यांनी नुकताच दिला आहे. त्यामुळे भिवंडी तालुक्यातील कारीवली गावात खळबळ माजली आहे.

देवराज कचेर नाईक असे कारवाई झालेल्या सरपंचांचे नाव आहे. कारीवली ग्रामपंचायतींच्या जानेवारी 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट मतदारातून सरपंच म्हणून देवराज नाईक हे विजयी झाले होते. परंतु त्यांनी एप्रिल 2018 ते मार्च 2019 या आर्थिक वर्षात ज्या चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे, त्या घेतल्या नसल्यामुळे रामचंद्र मोतीराम पाटील, हनुमान शांताराम चौधरी, योगेश प्रकाश पाटील, विलास रामचंद्र जोशी, सुषमा दयानंद पाटील, पुनम मेघनाथ पाटील, राधा अभिमन्यु चौधरी, जमुना दशरथ नाईक या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी या बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती.

देवराज यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते त्यावर अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात पुन्हा सुनावणी घेण्या बाबतीत न्यायालयाने निकाल दिल्यावर पुन्हा एकदा अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांनी या प्रकरणी सुनावणी घेतली. उच्च न्यायालयाने दिलेल्या नव्याने फेरचौकशी पूर्ण करुन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 7 (1) अन्वये सरपंच देवराज नाईक यांचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पद रद्द करीत असल्याचा निर्णय अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांनी दिला.