महाराष्ट्र : दुधाच्या व्यवसायासाठी शेतकऱ्याने खरेदी केले 30 कोटींचे हेलिकॉप्टर

लोनाड : पोलिसनामा ऑनलाईन – हौस करायला काही मोल नसते. मग त्यासाठी वाटेल ते करायची तयारी असते. अनेक घटना आहेत की केवळ हौसेसाठी काहीतरी केलं आहे किंवा खरेदी केली आहे. यापूर्वी आपण नववधूचे किंवा वराचे लग्नस्थळी हेलिकॉप्टरने आगमन झाल्याचे पहिले आहे. परंतु एका शेतकऱ्याने चक्क हेलिकॉप्टरच खरेदी केले आहे. भिवंडी तालुक्यातील वडपे गावातील शेतकरी, उद्योजक जनार्दन भोईर असे त्यांचे नाव आहे.

भिवंडीत गोदाम व्यवसाय विस्तारल्याने भंगार आर्थिक सुबत्ता आहे. बांधकाम व्यवसायाला भोईर यांनी सुरूवात करून आपल्या जमिनीवर गोदाम बनविले तर काही विकासकांना जमीन विकसित करायला दिली. त्यांचा व्यवसायानिमित्ताने उद्योजक, व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील व्यक्तींशी संपर्क आल्याने त्यांनी या नव्या व्यवसायाचे धाडस केले. भोईर हे दुग्ध व्यवसायही करतात. त्यामुळे या व्यवसायानिमित्त त्यांना नेहमी पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान येथे जावे लागते, तर व्यावसायिक संबंधातील व्यक्तींना या भागात येण्यासाठी हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतल्याचे भोईर यांनी सांगितले.

अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागात महागड्या कार फिरताना नेहमीच दिसतात. काही दिवसापूर्वी भिवंडी तालुक्यातील दिवेअंजूर येथील अरुण आर. पाटील या आगरी समाजातील उद्योजकाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात वापरली जाणारी कार भारतात प्रथम खरेदी करण्याचा बहुमान मिळवला होता त्यानंतर वडपे या गावात राहणारे व मूळचे शेतकरी असलेले भोईर यांनी चक्क ३० कोटींचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना अचंबित केले आहे.

विजयी सदस्यांना फेरफटका
भोईर यांच्याकडे हेलिकॉप्टरसाठी आवश्यक जागा आहे की नाही हे तपासण्यासाठी रविवारी मुंबईमधून काही तंत्रज्ञ हेलिकॉप्टर घेऊन वडपे गावात आले. तिथे अडीच एकर जागेवर संरक्षक भिंतीसह हेलिपॅड, हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी गॅरेज, पायलट, इंजिनिअर, सुरक्षारक्षक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. हे हेलिकॉप्टर १५ मार्च रोजी येणार आहे. दरम्यान, हेलिकॉप्टरमध्ये भोईर यांनी स्वतः न बसता ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी सदस्यांना फेरफटका मारून आणला.