पट्टेरी वाघांची कातडी, पंजाची तस्करी करणार्‍या चौघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन –   पट्टेरी वाघाची कातडी आणि पंजाची तस्करी करणाऱ्या चौकडीला कोनगाव पोलिसांनी मंगळवारी (दि.20) सापळा रचून अटक केली आहे. भिवंडी तालुक्यातील नाशिक- मुंबई बायपास महामार्गावर ठाकूरपाडा गावच्या हद्दीत पोलिसांनी ही कारवाई केली. या तस्करांकडून पोलिसांनी लाखोंचा मुद्देमालही जप्त केला आहे. दरम्यान हा मुद्देमाल आरोपींनी कुठून आणला व तो कुणाला विकण्यासाठी चालविला होता. याचा तपास पोलिसांनी सुरु केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी दिली आहे.

प्रशांत सुशिलकुमार सिंग, (वय 21), चेतन मंजे गौडा (वय 23 ) आर्यन मिलींद कदम (वय 23 तिघेही रा. वडाळा, मुंबई ) अनिकेत अच्युत कदम ( वय 25 रा. सायन कोळीवाडा, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. चौघांनाही बुधवारी न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्यांना 25 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोनगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील ठाकुरपाडा गावच्या हद्दीतील बासूरी हॉटेलच्या समोर काही तस्कर पटटेरी वाघ या वन्यजीव प्राण्याचे कातडे व पंजा विक्रीला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी वन विभागाचे कर्मचारी व वॉर रेस्क्यु फाऊन्डेशनच्या मदतीने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपीवर कोनगाव पोलीस ठाण्यात वन्यजिव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केले आहे. आरोपीकडून लाखोचे पट्टेरी वाघाचे कातडे व पाच नखे असलेला पंजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलीस उप निरीक्षक पराग भाट, सहायक पोलीस उप निरीक्षक वामन सुर्यवंशी, पो.हवा राजेश शिंदे, संतोष मोरे, पो.ना विनायक मासरे, संतोष पवार, अविनाश पाटील, अशोक ढवळे, कृष्णा महाले व गणेश चोरगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील करीत आहेत.