तब्बल 14 वर्ष केलं ‘ते’ काम अन् आता हाती लागलं हक्काचं Work, जाणून घ्या ‘चिची हाऊस’ची स्टोरी

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन –  सध्या देशात कोरोना संसर्गाने थैमान घातलं आहे. त्याचं पार्श्वभूमीवरती भारतात लॉकडाऊन पुकारण्यात आले. याच लॉकडाऊन च्या काळात छोट्या – छोट्या व्यवसायांवर याचा मोठा परिणाम झालेला दिसून आला. कोरोना संसर्गामुळे देह व्यापार व्यवसायावर देखील परिणाम होऊन व्यवसाय करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ आली. मात्र, शहरातील देह व्यापार करणाऱ्या महिलांची वस्ती असलेला हनुमान टेकडी परिसर म्हणजे जणू काही बदनाम वस्ती. या बदनाम वस्तीत नेहमी गिऱ्हाईकाच्या शोधात भिरभिरणाऱ्या नजरांची खुणावणारे हात आता अगरबत्ती पॅकिंगच्या व्यवसायात गुंतले आहेत.

या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून श्री साई सेवा संस्थेच्या स्वाती खान यांनी चार वर्षांपूर्वी सामाजिक आरोग्य विषयक कार्यास सुरुवात केली होती. तेव्हाच येथील महिलांशी स्वाती खान यांचे स्नेहाचे संबंध निर्माण झाले. देशात कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. या काळात अनेक उद्योग व्यवसाय बंद असतानाच स्वाती खान यांच्या नेतृत्वाखाली येथील महिलांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरता आपला रोजगार असलेला देहव्यापार बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

समाजसेवी संस्थांनी लॉकडाऊन काळात या महिलांसाठी धान्य किराणा साहित्य आजपर्यंत पुरवले. पण त्यांच्या पोटाची भूक भागवून स्वस्थ न बसता स्वाती खान यांनी या महिलांना काहीतरी रोजगार उपलब्ध करुन देण्याचे ठरवले. येथील २५ महिलांनी अगरबत्ती पॅकिंग, दिवाळी शोभेची लायटिंग बनविणे या कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर होण्याचे धडे दिले. आणि हळूहळू या कामातून पैसे मिळायला सुरुवात झाल्यावर देहव्यापार करुन जीवन व्यतीत करणाऱ्या चार महिलांनी देहव्यापार बंद करुन सर्वसामान्य महिलांचे जीवन जगण्याचा निश्चय केला आहे.

स्वाती खान यांनी त्यासाठी या परिसरातील चार खोल्या भाड्याने घेऊन त्यास रंगरंगोटी करुन नव्या स्वरुपातील घर या महिलांच्या ताब्यात दिले. त्याचा लोकार्पण सोहळा व या महिलांना समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा कार्यक्रम शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या महिलांना घराची व्यवस्था करताना त्यांना पैशांसाठी कोणाकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही, असा रोजगार त्यांना उपलब्ध करून देत महिलांसाठी ‘चीची हाऊस’ ची संकल्पना राबवली आहे.

‘चीची हाऊस’ या मल्याळम शब्दाचा अर्थ म्हणजे बहिणीचे घर. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणल्यामुळे मनाला आत्मिक समाधान मिळाल्याचं स्वाती खान यांनी म्हटलं. तसेच १४ वर्ष या देहव्यापार व्यवसायात नरक यातना भोगलेल्या एका ३० वर्षीय महिलेने या व्यवसायाचा त्याग केल्यानंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात दाखल होताना या महिलांच्या डोळ्यांत आनंदाअश्रू आले.